प्रवेश प्रक्रियेतील अडसर अखेर दूर
By Admin | Updated: June 28, 2014 01:00 IST2014-06-28T01:00:27+5:302014-06-28T01:00:27+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची मान्यताप्राप्त कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य व शिक्षकांची नियुक्ती केली नसल्यामुळे ...

प्रवेश प्रक्रियेतील अडसर अखेर दूर
चंदन मोटघरे लाखनी
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची मान्यताप्राप्त कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात प्राचार्य व शिक्षकांची नियुक्ती केली नसल्यामुळे प्रवेश प्रक्रिया सत्र २०१३-१४ मध्ये थांबविण्यात आले होते. विद्यापीठाच्या विद्वत सभेत निर्णय घेऊन काही अटींवर महाविद्यालयांना प्रवेश प्रक्रियेसाठी परवानगी दिल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
ज्या महाविद्यालयात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविल्या जात आहे, त्या महाविद्यालयामध्ये उपलब्ध अभ्यासक्रमातील मंजूर तुकड्याप्रमाणे कार्यभार तसेच इतर लागू होणाऱ्या निकषाप्रमाणे आवश्यक असलेल्या पुर्णकालीन शिक्षकाच्या संख्येपेक्षा किमान ५० टक्के पूर्णकालीन शिक्षकाची नेमणूक केली आहे. त्यांना विद्यापीठाच्या विद्वत परिषदेमध्ये संमत केलेल्या निर्णयानुसार ज्या अभ्यासक्रमात भाषेचा अनिवार्य विषय असेल अशा अभ्यासक्रमाकरीता ५० टक्के शिक्षकांच्या संख्येत भाषेचा एक शिक्षक असणे आवश्यक आहे. विद्यापीठ मान्यताप्राप्त पूर्णकालीन प्राचार्य अथवा पूर्णकालीन किमान एका शिक्षकाची नेमणूक संबंधित अभ्यासक्रमासाठी झालेला असावा असा निर्णय घेतला आहे. उर्वरित शैक्षणिक भाराची पूर्तता करण्यासाठी सर्व महाविद्यालयानी तात्पुरती व्यवस्था म्हणून तासिका तत्वावर योग्यताप्राप्त शिक्षकाची नेमणूक सत्र सुरु होताना करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
विज्ञान शाखेअंतर्गत समाविष्ट अभ्यासक्रमाकरीता विषय निहाय शिक्षकाच्या नेमणुका करणे अनिवार्य आहे. ही अट पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरीता स्वतंत्रपणे लागू राहील. ही अट सत्र २०१४-१५ मधील व पुढील सत्रात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता लागू होणार आहे. विद्यापीठाच्या अटीची पूर्तता करण्याची जबाबदारी संस्थेचे अध्यक्ष, सचिव व प्राचार्य यांची राहणार आहे. या अटीचे उल्लंघन करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा विद्यापीठाद्वारे घेतल्या जाणार नाहीत. व त्यातून उद्भवणाऱ्या कुठल्याही कायदेशिर जबाबदारीला विद्यापीठ उत्तरदायी नसल्याचे विद्यापीठाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यात अनेक कायम विना अनुदानित महाविद्यालये आहेत. ज्यांची मागील सत्रात प्रवेश प्रक्रिया थांबविण्यात आली होती.
विद्यापीठाच्या आदेशानुसार अनेक महाविद्यालयांनी पूर्णवेळ प्राचार्य व प्राध्यापकांची नेमणूक केली आहे. अनेक महाविद्यालयांनी शिक्षक निवडीची प्रक्रिया विद्यापीठाच्या मंजुरीने सुरू केली आहे. कायमविना अनुदानित महाविद्यालयात अनेक उमेदवार नोकरीसाठी जात नसल्यामुळे संस्था संचालकांपुढील डोकेदुखी वाढली आहे.