दारूची अवैध विक्री बंद करा

By Admin | Updated: August 23, 2014 23:49 IST2014-08-23T23:49:03+5:302014-08-23T23:49:03+5:30

अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बाक्टी/चान्ना येथील अवैधरित्या सुरू असलेली मोहफुलांची व देशी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक गोवर्धन बडवाईक यांनी केली आहे.

Close the sale of alcohol | दारूची अवैध विक्री बंद करा

दारूची अवैध विक्री बंद करा

बोंडगावदेवी : अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बाक्टी/चान्ना येथील अवैधरित्या सुरू असलेली मोहफुलांची व देशी दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी मागणी समाजसेवक गोवर्धन बडवाईक यांनी केली आहे.
बाक्टी येथील गोवर्धन बडवाईक ग्रामस्तरावर स्वच्छता मोहीम राबवितात. गावातील पानटपरीवरसुद्धा जमलेल्या लोकांना प्रबोधन करतात. सातत्याने समाजहित्याच्या गोष्टी सांगून लोकोपयोगी कामे करण्यात त्यांना स्वारस्य आहे. गावात मोठ्या प्रमाणात मोहफुलांची दारू हातभट्टीच्या माध्यमातून काढली जाते. जवळपास ५० लोक या व्यवसायात गुंतले आहेत. गावच्या चारही बाजूला मोहफुलांची व देशी दारू सहज उपलब्ध होत असते. दारूच्या आहारी अख्खे कुटूंब गेल्याचे चित्र आजही गावात दिसत आहे. ‘हातावर कमवून पानावर खाणारे’ सर्वसाधारण कुटुंबामध्येच व्यसनाधिनतेचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
गावात सर्वत्र तसेच दर्शनी स्थळी सहजरीत्या मोहफुलांची दारू व देशी दारू उपलब्ध असल्याने बाक्टी गावाशेजारील तसेच काही अंतरावरून शौकीनबाजांची रीघ लागते. दारूचा डोज जास्त झाल्याने अनेकांना नशेच्या गुंगीने स्वत:च्या गावी जाणे अवघड होवून रस्त्यामध्ये काही शौकीनबाज लोक पडल्याचे अनेकदा घडले. काहींना त्यांच्या घरी सुखरूपपणे नेवून दिल्याचे समाजसेवक गोवर्धन बडवाईक यांनी सदर प्रतिनिधीजवळ सांगितले. काहींनी आपला वंशपरंपरागत व्यवसाय म्हणून मोहफुलांच्या दारू विक्रीवर जोर देवून चांगलाच जम बसविल्याचे दिसते. दिवसेंदिवस अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या संख्येमध्ये कमालीची वाढ होत आहे. शारीरिक त्रासाचा लवलेशही या व्यावसायिकांना लागत नसल्याने गावात अवैध मोहफुलांच्या दारू विक्रीसह देशी दारू विक्रीलाही उधाण आल्याचे चित्र दिसत आहे. शौकीनबाज कुटुंबाच्या घरी अठराविश्वे दरिद्रता व भांडणाचा कलह दिसून येतो. दारूच्या व्यसनामुळे कित्येक कुटुंबांची वाताहत झाल्याचे दिसते.
बाक्टी गावात अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी गेल्या काही वर्षापूर्वी युवक वर्गाकडून तसेच संबंधित यंत्रणेकडून प्रयत्न केला गेला. काही दिवस जरब बसला. परंतु अवैध दारू विक्रीवर आळा घालणाऱ्या संबंधित यंत्रणेने आपला कासरा ढिला केल्याने पुन्हा धंदा करणाऱ्यांची छाती फुलली. दारूसाठी आवश्यक असलेली मोहफुले घरपोच मिळण्याची सोय असल्याने या धंद्यामध्ये आणखी वाढ होत आहे. युवकवर्ग व्यसनाधिनतेकडे वळत आहे. गावात शांतता व समृद्धी नांदण्यासाठी बाक्टी गावातील अवैध दारू विक्री कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी समाजसेवक गोवर्धन बडवाईक यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Close the sale of alcohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.