हातपंपावर महिलांना दिले स्वच्छतेचे धडे
By Admin | Updated: February 26, 2017 00:30 IST2017-02-26T00:30:26+5:302017-02-26T00:30:26+5:30
शाळेच्या मागील बाजूला हातपंपावर महिला पाणी भरत होत्या. हातपंपालगत व सभोवती घाण पसरली होती. काही महिला पाण्याचे गुंड तिथे धूत होत्या.

हातपंपावर महिलांना दिले स्वच्छतेचे धडे
सुकळीत महिलांनी दिली साद : पिण्याच्या पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवण्याचे आवाहन, विविध प्रश्नांच्या उत्तरांनी महिलांचे समाधान
भंडारा : शाळेच्या मागील बाजूला हातपंपावर महिला पाणी भरत होत्या. हातपंपालगत व सभोवती घाण पसरली होती. काही महिला पाण्याचे गुंड तिथे धूत होत्या. काही अंतरावर कपडे धुणे सुरु होते. अशा अस्वच्छतेमुळे आरोग्यावर परिणाम होतात, याची कल्पनाच महिलांना नसल्याने पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी महिलांना स्वच्छतेचे धडे दिले.
स्वच्छतेचे महत्व महिलांना सांगितले आणि क्षणात महिलांनी स्वत: हातपंपाची स्वच्छता केली. हा प्रसंग होता पंचायत समिती तुमसर अंतर्गत ग्राम पंचायत सुकळी येथील. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतावर हातपंप असो व विहिर असो, यावर कपडे, भांडेकुंडे, पाण्यासाठी वापरात यणारे माठही त्याच ठिकाणी स्वच्छ केल्या जातात, हे चित्र सर्वत्र बघायला मिळते. असेच चित्र तुमसर पंचायत समिती सुकळी दे. येथे आढळून आले. वैयक्तिक शौचालय बांधकामाची पाहणी व ज्या कुटुंबांनी शौचालयाचे बांधकाम केले नाही त्या कुटुंबांना भेटी देवून शौचालयाकरिता प्रोत्साहित करण्यात येत होते.
दरम्यान शालेय परिसरातील कुटुंबांना भेटी दरम्यान रस्त्यालगत दुपारच्या सुमारास हातपंपवर काही महिला पाणी भरत होत्या. काही महिला कपडे धूत होत्या. हातपंपवर व सभोवती घाण पसरली होती. त्याच स्थितीत महिला पाणी भरत होत्या. परंतु त्या ठिकाणी असलेली घाण मात्र कोण स्वच्छ करणार असा प्रश्न होता. पाण्याचा माठ कितीही स्वच्छ केला परंतु त्याच्या बुडाला जर घाण लागत असेल, हातपायाद्वारे ती घाण जर घरात जात असेल तर ते पाणी स्वच्छ समजायचे काय? असा प्रश्न होता. अखेर त्या ठिकाणी जावून महिलांना हातपंपावरील घाणीबाबत अवगत केले असता, साहेब आम्हीच भरतो का पाणी, पुष्कळ महिला पाणी भरतात, ग्रामपंचायतीने स्वच्छ करावी, महिलांनीही स्वच्छ करावी, आम्हीच का म्हणून स्वच्छ करायचे असे अनेक प्रश्न उपस्थित होते. यावेळी माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, पाणी गुणवत्ता सल्लागार पौर्णिमा डुंभरे, ग्रामपंचायत कर्मचारी तेजराम नेरकर यांची उपस्थिती होती. विविध प्रश्न उपस्थित करीत असलेल्या महिलांना पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताबद्दल राजेश येरणे, पौर्णिमा डुंभरे यांनी विचारणा केली. पिण्याचे स्त्रोत कुणाकरिता, पाणी कोण वापरते, घाणीद्वारे अशुद्ध पाणी कोणाच्या घरी जाते, अशुद्ध पाण्याचा त्रास कुणाला सहन करावा लागतो, बोअरवेलवर घाणीसाठी कोण जबाबदार आहे असे अनेक प्रश्न त्यांना विचारून त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याद्वारेच देण्यात आली. मग सगळ्या गोष्टीमुळे आपल्याला कुटुंबाला त्रास होणार असेल तर स्वच्छतेसाठी महिलांनी पुढाकार का घेऊ नये, पिण्याचे शुद्ध म्हणून आपण भरतो तर त्या पाण्याची शुद्धता का जपू नये असे पटवून देत महिलांना स्वच्छतेची महती सांगितली. उपस्थित महिलांना त्याची महती पटली अािण आश्चर्य झाले. त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन. हातपंपावरची घाण स्वच्छ केली. सभोवतीचा परिसर स्वच्छ केला. संपूर्ण हातपंपाची स्वच्छता केल्याशिवाय पाणी भरले नाही. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी यांनीही स्वच्छता केली व हातपंपाची स्वच्छता करण्यात आली. यावेळी सरपंच बांडेबुचे आले त्यांनाही पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताबाबद स्वच्छतेसाठी सांगण्यात आले. यावेळी महिलांनी स्वच्छतेच्या कार्यासाठी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पण या प्रसंगामुळेच त्या महिलांच्या मनातील नकारात्मक असलेले स्वच्छतेचे महत्व सकारात्मकरित्या पटवून देण्याचे आल्याचे समाधान यावेळी पहायला मिळाले. पाण्याची स्त्रोतांची स्वच्छता महिलांच्या पुढाकारातून झाली तर ग्रामपंचायतीला त्यावर वेगळा पैसा खर्च करावा लागणार नाही. त्याहीपेक्षा स्त्रोतांचे पाणी चांगले राहील व विविध उपक्रम राबविण्यासाठी लोकसहभाग तयार होईल. (शहर प्रतिनिधी)