आई मला माफ कर! बालविकास अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2021 17:49 IST2021-03-06T17:49:25+5:302021-03-06T17:49:40+5:30
शीतल फाळके यांच्या आत्महत्येमुळे जिल्ह्याच्या शासकीय वर्तुळात हळहळ

आई मला माफ कर! बालविकास अधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
लाखनी (भंडारा) : बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना लाखनी येथे शनिवारी पहाटे पावणे चारच्या सुमारास उघडकीस आली. त्यांनी भाड्याच्या घरातील बाथरूममध्ये ओढणीने गळफास लावून घेतला.
शीतल अशोक फाळके (२८) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. त्या मूळच्या सातारा येथील रहिवासी होत्या. ३० जून २०१७ पासून त्या लाखनी येथे कार्यरत होत्या. त्या अविवाहित असून आईसोबत येथील माणिक निखाडे यांच्या घरी भाड्याने राहत होत्या. शनिवारी पहाटे बाथरूममध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांच्या आईला दिसल्या. या घटनेची माहिती तात्काळ लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केला. त्यावेळी सुसाईड नोट आढळून आली. त्यात त्यांनी स्वतःच्या मर्जीने आत्महत्या करत असून आई मला माफ कर असे लिहिलेले आहे.
शीतल फाळके काही दिवसांपासून तणावात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी दुपारी त्या कार्यालयात रडत असल्याचे सांगण्यात आले. मृदू आणि प्रेमळ स्वभावाच्या शितल कर्मचाऱ्यांत प्रिय होत्या. त्यांच्या आत्महत्येने जिल्ह्याच्या शासकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.