अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीला जमिनीवर आपटले
By Admin | Updated: November 1, 2014 22:46 IST2014-11-01T22:46:50+5:302014-11-01T22:46:50+5:30
पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचे गवंडी कामावर असलेल्या पुरुषाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध आले.

अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीला जमिनीवर आपटले
सिरसघाट येथील घटना : आरोपीला अटक, तीन दिवसांची पोलीस कोठडी
भंडारा : पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिलेचे गवंडी कामावर असलेल्या पुरुषाशी ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखविल्यामुळे त्यांच्यात शारीरिक संबंध आले. यातच त्या महिलेला दिवस गेले. त्यानंतर तिला गर्भपात करण्याचा अट्टाहास धरला. परंतु, काही ऐकले नाही. महिनाभरापूर्वी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर त्या पुरुषाने त्या चिमुकलीला जमिनीवर आपटून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे.
ही घटना सिरसघाट येथे घडली असून याप्रकरणी आरोपी शेखर सहादेव तरारे (३५) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.
भंडारा तालुक्यातील सिरसघाट येथील ३४ वर्षीय पीडित महिला ही पूर्वी होमगार्ड सेवेमध्ये कार्यरत होती. सध्या ती गवंडी कामावर मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालविते. सदर महिला पतीपासून विभक्त असून तिला १२ वर्षाचा मुलगा आहे.
विभक्त झाल्यापासून ती सिरसघाट येथे माहेरी राहत आहे. आमगाव (दिघोरी) येथील शेखर तरारे हा गवंडी काम करतो. कामादरम्यान दोघांची नोव्हेंबर २०१३ मध्ये गांधी चौकात ओळख झाली. त्यानंतर एकाच कामावर राहत असल्यामुळे त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. कालांतराने प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. दरम्यान त्याने लग्न करणार असल्याचे आमिष देत शेखरकडून पीडित महिलेला गर्भधारणा झाली.
ही बाब तिने मे महिन्यात शेखरला सांगितली. त्यानंतर त्याने गर्भपात करण्याचा सल्ला दिला. मात्र पीडिता ही पतीपासून विभक्त राहत असल्यामुळे व दोघेही एकाच समाजाचे असल्याने प्रसूती झाल्यानंतर तो तिला स्वीकारेल, असे तिला वाटत असल्यामुळे तिने गर्भपाताला विरोध केला.
या दरम्यान शेखरने महिलेला गर्भपातासाठी २० हजार रुपये दिले होते. मात्र पीडितेने गर्भ आडवे असल्यामुळे गर्भपात होत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे कारण शेखरला सांगितले. दरम्यान, या महिलेने शुक्रवारला प्रसूती झाल्याचे शेखरला सांगितले. प्रसूतीसाठी आलेला खर्च देण्यासाठी तिने फोन केला होता. आता समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी शेखरने पीडितेचे घर गाठले. यावेळी पीडिता घरातील दरवाजात मुलीला घेऊन बसली होती. शेखरच्या डोक्यात संताप संचारला असताना त्याने बहाणा करून तिला पिण्याचे पाणी मागितले.
त्यानंतर ती मुलीला त्याच्याजवळ सोपवून घरात पाणी आणण्यासाठी गेली.
ही संधी साधून शेखरने २१ दिवसाच्या बाळाला संतापाच्या भरात ठार करण्याच्या उद्देशाने जमिनीवर आपटले. त्यानंतर बाळाने किंकाळी फोडल्याने ती धावून आली व पुढील अनर्थ टळला. यात नवजात बाळ गंभीररीत्या जखमी झाला आहे.
याप्रकरणी कारधा पोलिसात पीडित महिलेने तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी शेखरविरुद्ध कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून या घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र शेट्टे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)