तलाव स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष-मुख्याधिकारी सरसावले
By Admin | Updated: July 22, 2015 01:08 IST2015-07-22T01:08:40+5:302015-07-22T01:08:40+5:30
शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रभाग क्रमांक सातमधील सागर तलावाच्या स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष बाबूराव बागडे, ....

तलाव स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष-मुख्याधिकारी सरसावले
सागर तलावाची सफाई : चार ट्रॅक्टर गाळ उपसला
भंडारा : शहराच्या मध्यभागी असलेल्या प्रभाग क्रमांक सातमधील सागर तलावाच्या स्वच्छतेसाठी नगराध्यक्ष बाबूराव बागडे, मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांच्यासह नगरसेवक हिवराज उके यांनी श्रमदान करुन तलावातील गाळ उपसला.
पालिकेने शहरातील सफाईची योजना आखली आहे. पहिल्या टप्प्यात सागर तलावाची स्वच्छता करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार आज मंगळवारला पालिकेने स्वच्छतेसाठी लागणारे संपूर्ण साहित्य तलावाच्या ठिकाणी नेले. नगराध्यक्ष बाबूराव बागडे यांनी चिखल असलेल्या पाण्यात उतरवून हातात फावडा घेऊन सफाई करु लागले. त्यांचे हे काम पाहून तिथे उपस्थित तरुणांसह नागरिकांनी हातात फावडे, घमेले घेऊन तलावाची सफाई करण्यासाठी सरसावले. अवघ्या दोन तासात चार ट्रॅक्टर गाळ आणि कचरा जमा झाला. आता या स्वच्छतेनंतर या तलावात पाणी दिसू लागले आहे.
याची माहिती भंडाराचे पोलीस निरिक्षक हेमंत चांदेवार यांना कळताच त्यांनी यापुढे स्वच्छता अभियानासाठी ५० पोलिसांच्या कुमकसोबत आपण स्वत: सफाई करणार असल्याचे मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांना सांगितले.
दरम्यान, मंगळवारला हुतात्मा स्मारक सभागृहात झालेल्या महिला बचत गटाच्या बैठकीत १०० महिलांचा एक गट वॉर्डनिहाय स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी शहरातील पतंजली योगपिठाचे रामविलास सारडा यांनी एक वॉर्ड दत्तक घेऊन मॉडेल वॉर्ड करण्याचा संकल्प मुख्याधिकाऱ्यांना केल्याचे देवतळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)