मुख्यमंत्र्यांचा सरपंचांसोबत संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:32 IST2019-01-05T21:31:53+5:302019-01-05T21:32:14+5:30
राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा मान मिळाला.

मुख्यमंत्र्यांचा सरपंचांसोबत संवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा मान मिळाला.
ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात कोटी २५ लाख ३६ हजार रुपये खर्चाच्या १६ पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ई-भूमिपूजन करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील करडी व तुमसर तालुक्यातील येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनास पाणीपुरवठा मंत्र्यांनी मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एम.बी. मैदमवार, माजी सभापती नरेश डहारे आणि विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हीडीओ कॉन्फरन्सीच्याद्वारे मुख्यमंत्र्यांनी कांद्री येथील सरपंचासोबत थेट संपर्क साधला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.
यावेळी कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांनी कांद्री हे गाव आयएसओ असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. कांद्री गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. या योजनेमुळे गावकऱ्यांना पाणी मिळणार असून हे आपल्यामुळेच घडणार असल्याचे शालूताई मडावी यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासह गावकºयांचे अभिनंदन केले.
खासदारांनी केली आरओ प्लांटची मागणी
जिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधताना खासदार मधुकर कुकडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आरो प्लांटची मागणी केली. भंडारा शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आरओ प्लांट देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालयांना शुद्ध पाणी पुरवठा व आरओ प्लांटबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.