रेती घाटावरील चेकपोस्ट म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:37 IST2021-03-27T04:37:23+5:302021-03-27T04:37:23+5:30
जिल्ह्यातील लिलाव न झालेल्या अनेक रेतीघाटावरून बिनधास्त रेती चोरी सुरू आहे. खुद भंडारा येथे आयटीआय समोरून दिवसभर रेतीचे ...

रेती घाटावरील चेकपोस्ट म्हणजे जनतेच्या डोळ्यात धूळफेक
जिल्ह्यातील लिलाव न झालेल्या अनेक रेतीघाटावरून बिनधास्त रेती चोरी सुरू आहे. खुद भंडारा येथे आयटीआय समोरून दिवसभर रेतीचे ट्रॅक्टर धावतांना दिसतात. शास्त्री चौकातील रस्त्यावर रेतीच रेती विखुरलेली आढळते. या रस्त्यावरून महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची ये जा सुरू असते मात्र कारवाई केली जात नाही. रेती घाटावरून होणाऱ्या अमर्यादित रेती उपश्याला आळा घालण्यासाठी मोडाडी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी तालुक्यातील रोहा रेती घाटावर २४ तास बैठे पथक (चेकपोस्ट) नेमण्याच्या सूचना मोहाडी तहसीलदारांना दिल्या होत्या. त्यानुसार तहसीलदारांनी सोमवार ते रविवार २४ तास बैठे पथक नियुक्तीचे आदेश काढले. या आदेशाची प्रत उपविभागीय अधिकाऱ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पाठविण्यात आली. सकाळी ६ ते दुपारी २, दुपारी २ ते रात्री १०, व रात्री १० ते सकाळी ६, वाजेपर्यंत तालुक्यातील तलाठी, कोतवाल यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. तसेच सनियंत्रण अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असून उपविभागीय दंडाधिकारी यांच्या सूचनेला व तहसीलदार यांच्या लेखी आदेशाला ठेंगा दाखविण्यात आला आहे. रेती घाटावर चेक पोस्ट तयार करण्यात आलेला नाही. त्यामुळे रेती चोरी जोमात सुरू असून दिवसभर अवैध रेतीचे टिप्पर व ट्रॅक्टर धावत असतात. परंतु त्यांच्यावर कार्यवाही होत नाही. काही नागरिकांनी याची तक्रार सुध्दा केली, परंतु महसूल कर्मचाऱ्यांच्या डोळेझाक प्रवृत्तीमुळे कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.