मोहाडीतील जागृत माता चौंडेश्वरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:38+5:30
मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवसांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जाणकारांच्या मते, आज जिथे चौण्डेश्वरी मातेचे मंदिर आहे तिथे फार वर्षापूर्वी झुडपी जंगल होते. बाजूलाच गायमुख नदी वाहत असे. हे स्थळ शांत व निसर्गरम्य असल्याने याठिकाणी श्रीसंत नारायण स्वामी यांनी मुक्काम केला होता. ते या ठिकाणी तपश्चर्या करायचे.

मोहाडीतील जागृत माता चौंडेश्वरी
सिराज शेख।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : मोहाडीची कुलदैवत माता चौण्डेश्वरीचे देवस्थान हे एक जागृत देवस्थान आहे. माता चौंडेश्वरीची मूर्ती ही स्वनिर्मित असल्याने या मंदिराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मंदिरात यावर्षी १,६२२ ज्योतीकलशांची स्थापना करण्यात आली आहे.
मंदिरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून नऊ दिवसांच्या यात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जाणकारांच्या मते, आज जिथे चौण्डेश्वरी मातेचे मंदिर आहे तिथे फार वर्षापूर्वी झुडपी जंगल होते. बाजूलाच गायमुख नदी वाहत असे. हे स्थळ शांत व निसर्गरम्य असल्याने याठिकाणी श्रीसंत नारायण स्वामी यांनी मुक्काम केला होता. ते या ठिकाणी तपश्चर्या करायचे. त्यावेळी नारायण स्वामी यांनी रोगराई नष्ट होण्यासाठी गावात शांतता व समृद्धीसाठी महायज्ञ करण्याचे ठरविले. श्री दत्तपाठ गुरुघटाची स्थापना करून त्यांनी महायज्ञ सुरु केले. गावकऱ्यांच्या मदतीने महायज्ञासाठी लागणारी हवनसामुग्री गोळा करण्यात आली. महायज्ञाच्या आवतनासाठी ठेवण्यात आलेली संपूर्ण हवनसामुग्री संपली तरी हवन पूर्ण झाले नाही म्हणून बाजूला ठेवलेले ऋगवेद, यजुर्वेद, अथर्ववेद व सामवेदाचे एक एक पान हवन कुंडात सोडण्यात येत असतानाच हवनकुंडातून गर्जना करीत मातेचा मोठा चेहरा बाहेर आला. महायज्ञ पूर्ण झाले असून तुम्ही जे चार वेद हवनकुंडात सोडले त्याचीच शक्ती बनून मी प्रगट झाली आहे. म्हणून तुम्ही मला चौरेदश्वरी म्हणू शकता. गावात सुख, शांती व समृद्धी राहील. सच्चा मनाने जो कोणी माझी आराधना करेल मी त्याची मनोकामना पूर्ण करेल.
मातेचा विशाल मुख पाहून नारायण स्वामी यांनी मातेला संपूर्ण शरीरासह बाहेर न येण्याची विनंती केली. मातेने स्मितहास्य करीत विनंती मान्य केली व अंतर्मुख झाली. कालांतराने माता चौरेदश्वरीचे नाव चौण्डेश्वरी असे झाले. मातेचा मुख फक्त हवनकुंडाच्या बाहेर आहे. बाकी संपूर्ण शरीर हवनकुंडाच्या आत जमीनीत असल्याचे सांगण्यात येते.
नऊ दिवसांची यात्रा
चौण्डेश्वरी देवस्थानासमोर नवरात्रोत्सवात नऊ दिवसांची दरवर्षी यात्रा भरते. दरवर्षी हजारो भाविक मातेच्या दर्शनासाठी येतात. नवरात्री उत्सव समिती पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उत्तम व्यवस्था करण्यात येते.