महिलांच्या पुढाकारातून बदलतोय शहराचा चेहरा
By Admin | Updated: October 29, 2015 01:01 IST2015-10-29T01:01:47+5:302015-10-29T01:01:47+5:30
महिला शिकली म्हणजे, घर सुधारते. महिलांनी टाकलेले पहिले पाऊल हे नेहमी प्रगतीच्या दिशेची नांदी असते, असे म्हटले जाते.

महिलांच्या पुढाकारातून बदलतोय शहराचा चेहरा
लोकमत शुभवर्तमान : विद्यार्थ्यांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद, भंडारा पालिका प्रशासनाचा सहभाग
प्रशांत देसाई भंडारा
महिला शिकली म्हणजे, घर सुधारते. महिलांनी टाकलेले पहिले पाऊल हे नेहमी प्रगतीच्या दिशेची नांदी असते, असे म्हटले जाते. या ओळी भंडारा शहरात सध्या खऱ्या ठरत असल्याची प्रतिची येत आहे. ग्रीनमार्इंड संस्थेशी जुळलेल्या महिलांनी शहरातील उद्यान, धार्मिक स्थळासह काही मुख्य चौकातील स्वच्छता करण्याचा विडा उचलला आहे. त्यांच्या पुढाकारातून येत्या काही दिवसात शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याची प्रचिती सध्या येत आहे.
शहराचा विकास साधण्यासाठी पालिका प्रशासन मोलाचे कार्य करीत आहेत. शहरातील नागरिकांना सुदृढ आयुष्य लाभावे यासाठी बालोद्यानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. यासोबतच धार्मिक स्थळ, पर्यटनस्थळ, शहरातील मुख्य चौक, शाळा महाविद्यालय परिसराच्या सौंदर्यात भर पडावी यासाठी पालिकेचे विकास कामे सुरू आहेत. मात्र, यास्थळी नारिकांना अनेकविध सोयीसुविधांचा सामना करावा लागत आहे. ही बाब हेरून शहरातील ग्रिन मार्इंड या स्वयंसेवी संस्थेत कार्यरत महिलांनी उद्यान, धार्मिकस्थळ व काही चौकाांचे सौंदर्यीकरण करण्याचा चंग बांधला.
त्यांनी ही बाब पालिका प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. या संस्थेतील महिला या गृहिणी, नोकरदार ज्यात काही शिक्षिका, व्यावसायीक, महाविद्यालयात अध्यापिका व विविध शासकीय कार्यालयात मोठ्या हुद्यावर आहेत. मात्र, या महिलांनी त्यांचा समाजातील मानसन्मान बाजूला ठेवून एकदिलाने व स्वयंस्फुर्तीने स्वच्छतेचा ध्यास घेत सर्वप्रथम शहरातील नागपूर नाका परिसर स्वच्छ करून ग्रिन मार्इंडचा अनोखा संदेश दिला. त्यानंतर खामतलाव परिसर स्वच्छ केला. यावेळी त्यांनी तलाव परिसरातील सिमेंट काँक्रीटच्या भिंतीवर असलेली विक्षिप्तता मिटवून त्यावर सुबक संदेश देणारी चित्र रेखाटली. या छायाचित्रातून महिलांनी समाजाला जागृतीचा व एकतेचा संदेश दिला आहे.
सध्या ग्रिन मार्इंडच्या महिला शहरातील हृदयस्थळ असलेल्या मिस्कीन टँक उद्यानाचा चेहरामोहरा पालटविण्यात गुंतल्या आहेत. बकाल स्वरूप आलेल्या या उद्यानाचा संपूर्ण चेहरा बदलला आहे. येथे प्रवेश करताच खरोखरचं एखाद्या उद्यानात आल्याची प्रचिती येवू लागली आहे. येथील भिंती व उद्यानात फिरावयाचे रस्त्यांना पेंट करण्यासाठी महिलांनी हातात कुंचले घेतले.
महिलांच्या पुढाकाराची बाब शहरातील अन्य शाळा महाविद्यालयांना मिळताच तेथील विद्यार्थ्यांनीही स्वयंस्फुर्तीने महिलांच्या कामात हातभार लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महिलांनी फेडले समाजाचे ऋण
या महिलांनी त्यांना समाजाचे काही ऋण फेडायचे असल्याची भावना मनात जोपासून शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा प्रयत्न केला आहे. एकेकाळी चुल आणि मुल सांभाळण्याची जबाबदारी ज्या महिलांवर होती. आता ती परिस्थिती नसली तरी, महिलांनी एखाद्या कामात पुढाकार घेतला तरी त्यांनी पाहिजे तसा पुरूषांचा प्रतिसाद मिळत नव्हता. मात्र, या कामात महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.
पालिकेचे महिलांना सहकार्य
महिलांनी घेतलेल्या पुढाकाराला पालिका प्रशासनाने सहकार्याची भूमिका घेतली आहे. महिलांच्या मदतीला पालिकेचे सफाई कामगार, टॅक्टर, गवत काढण्याची मशिन व अन्य प्रकारची मदत पुरवठा केली आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या या कामात पालिकेचा सहभागही महत्त्वाचा आहे. महिलांनी घेतलेला हा पुढाकार समाजातील प्रत्येक घटकाला प्रेरणादायी ठरणारा आहे.