पर्यावरण शिक्षण विषयाच्या मूल्यमापन पद्धतीत बदल

By Admin | Updated: August 23, 2015 00:54 IST2015-08-23T00:54:09+5:302015-08-23T00:54:09+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाच्या सुधारित मूल्यमापन योजना सत्र २०१५-२०१६ पासून लागू केली आहे.

Changes in the evaluation system of environmental education | पर्यावरण शिक्षण विषयाच्या मूल्यमापन पद्धतीत बदल

पर्यावरण शिक्षण विषयाच्या मूल्यमापन पद्धतीत बदल

बाह्य परीक्षकांची नियुक्ती करणार : इयत्ता १२ वी साठी नवीन निकष
चंदन मोटघरे लाखनी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे उच्च माध्यमिक इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाच्या सुधारित मूल्यमापन योजना सत्र २०१५-२०१६ पासून लागू केली आहे.
पर्यावरण शिक्षण हा विषय कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम व सर्व द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना अनिवार्य आहे. या विषयाची गुण विभागणी शैक्षणिक वर्ष २०१५-१६ पासून प्रथम द्वितीय या प्रमाणे दोन सत्रामध्ये न विभागता वार्षिक पद्धतीने मुल्यमापन करावे लागणार आहे. पुर्नरचित अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने पर्यावरण शिक्षण या विषयाची अंमलबजावणी इयत्ता ११ वी साठी सन २०१२-१३ पासून व इयत्ता १२ वी साठी सन २०१३-१४ पासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार सद्यस्थितीत इयत्ता ११ वी व १२ वीसाठी पर्यावरण शिक्षण या विषयाची गुणविभागणी प्रत्येक सत्रात ३० गुण प्रकल्प व २० गुण अंतर्गत मूल्यमापन यात सेमीनार जर्नल याप्रमाणे असून दोन्ही सत्रातील प्रत्येकी ५० गुणांची बेरीज करून १०० पैकी मिळालेल्या गुणांचे रुपांतर ५० गुणांमध्ये करून ५० पैकी मिळालेले गुण विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत दर्शविण्यात येतात. शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून इयत्ता ११ वी १२ वी साठी पर्यावरण शिक्षण या विषयाची मूल्यमापन योजना सुधारीत करण्यात येत आहे.
इयत्ता ११ वी व १२ वी पर्यावरण शिक्षण या विषयासाठी अंतर्गत व बाह्य परिक्षकांकडून मुल्यमापन करण्यात येईल. इयत्ता ११ वी साठी संबंधित महाविद्यालयातीलच शिक्षक बहि:स्थ व अंतर्गत परिक्षकाची कामे पाहतील. इयत्ता १२ वी साठी नवीन मूल्यमापन पद्धतीत बाह्य परीक्षकांची नियुक्ती मंडळाकडून करण्यात येईल. अंतर्गत परीक्षक व बाह्य परीक्षक यांच्या एकत्रित परीक्षणातून विद्यार्थ्यांना ५० पैकी मिळालेले गुण एकूण गुणांच्या बेरजेत धरून विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात येईल. पर्यावरण शिक्षण व विषयात ५० पैकी मिळालेले गुण मंडळाकडे अधिकृत गुण तक्त्यात सादर करावयाच्या सूचना शिक्षण मंडळाने दिल्या आहेत. इयत्ता ११ वी, १२ वी मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी पर्यावरण शिक्षण या विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. सदर विषयामध्ये ५० गुणांपैकी उत्तीर्णतेसाठी ३५ टक्के गुण अर्थात १८ गुण आवश्यक राहतील. पर्यावरण शिक्षण या विषयाची लेखी परीक्षा नसल्यामुळे या विषयाच्या बाबतीत पुनर्मूल्यांकन होणार नाही. पर्यावरण शिक्षण या विषयात सवलतीचे गुण देय असणार नाही. शिक्षण मंडळाने बाह्य परीक्षकांसाठी व अंतर्गत परीक्षकांनी करावयाची कार्यवाहीची माहिती परिपत्रकात दिलेली आहे. अंतर्गत परीक्षकांनी प्रकल्पाचे २० गुण व सेमीनार, जर्नलच्या १० गुणांचे मुल्यमापन करावयाचे आहे. तर बाह्य परीक्षकाने प्रकल्प कार्याचे १० गुण व सेमीनार, जर्नलच्या १० गुणांचे मूल्यमापन करावयाचे आहे. नवीन मूल्यमापन योजनेमध्ये शिक्षण मंडळाने पारदर्शकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. इयत्ता १२ वी च्या मूल्यमापनात बाह्य परीक्षकांची नेमणूक केलेली आहे. नवीन मूल्यमापन पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना संधी मिळेल.

Web Title: Changes in the evaluation system of environmental education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.