चंद्रपूरच्या दुचाकी चोरट्यांना अटक
By Admin | Updated: March 13, 2016 00:26 IST2016-03-13T00:26:57+5:302016-03-13T00:26:57+5:30
देव्हाडी व तुमसर परिसरातील अनेक दुचाकी चोरी गेल्या होत्या. त्या प्रकरणातील दोन दुचाकी सराईत चोरटे चंद्रपूर येथील तुरुंगातून तुमसर पोलिसांनी आणले.

चंद्रपूरच्या दुचाकी चोरट्यांना अटक
गुन्ह्याची कबुुली : १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी, तुमसर पोलिसांची कारवाई
तुमसर : देव्हाडी व तुमसर परिसरातील अनेक दुचाकी चोरी गेल्या होत्या. त्या प्रकरणातील दोन दुचाकी सराईत चोरटे चंद्रपूर येथील तुरुंगातून तुमसर पोलिसांनी आणले. त्यांची १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली.
ताब्यात घेतलेल्या चोरट्यांकडून दुचाकी चोरी व इतर मोठ्या चोरी प्रकरणात सुगावा लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रामु वेनू स्वामी (२८), अजय प्रकाश मद्देवार (३०) रा. चंदपूर अशी दोन्ही अट्टल चोरट्यांची नावे आहेत.
१७ आॅक्टोंबर २०१५ मध्ये देव्हाडी येथील आशिष टेंभुर्णीकर यांची दुचाकी देव्हाडी येथील सरोज फोटो स्टुडीओ समोरुन चोरीला गेली होती. आठ ते दहा दिवसानंतर ती नागपूर हुडकेश्वर येथे सापडली होती. याच परिसरातून चोरट्यांनी दुसरी दूचाकी चोरुन वर्धा येथे नेली होती. पोलीस तपासात सदर दोन्ही चोरट्यांनी गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातून दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना गोंदिया व चंद्रपूर पोलिसांनी अटक केली. चंद्रपुर पोलिसांना चोरट्यांनी दुचाकी चोरी कुठे केली याची सविस्तर माहिती दिल्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी या प्रकरणात तुमसर पोलिसांशी संपर्क साधला.
११ मार्च रोजी देव्हाडी पोलीस चौकीचे हवालदार अक्रम पठाण, शिपाई वैरागडे, वाघाडे चंद्रपूर येथे रवाना झाले. दोन्ही चोरट्यांना त्यांनी चंद्रपूरातून ताब्यात घेवून तुमसरात आणले. न्यायालयात हजर केले असता त्यांना १४ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मागील काही महिन्यापासून देव्हाडी, तुमसर व ग्रामीण परिसरात दूचाकी चोरीच्या घटनेत लक्षणीय वाढ झाली होती. या अट्टल चोरट्यांकडून दूचाकी शिवाय इतर मोठ्या चोरी प्रकरणात त्यांचा संबंध आहे काय? याची चौकशी सुरु आहे. (तालुका प्रतिनिधी)