चांदपूर पर्यटनस्थळ कागदावरच
By Admin | Updated: July 15, 2015 00:46 IST2015-07-15T00:46:06+5:302015-07-15T00:46:06+5:30
चांदपूर पर्यटनस्थळाला राजकीय इच्छाशक्तीचे ग्रहण लागल्याने सातपुडा पर्वत रांगातील हेवा वाटावा असा निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर भकास होण्याच्या मार्गावर आहे.

चांदपूर पर्यटनस्थळ कागदावरच
सन २००० मध्ये घोषणा
शासन उदासीन, अधिवेशनात चर्चेची गरज
तुमसर : चांदपूर पर्यटनस्थळाला राजकीय इच्छाशक्तीचे ग्रहण लागल्याने सातपुडा पर्वत रांगातील हेवा वाटावा असा निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर भकास होण्याच्या मार्गावर आहे. केंद्र व राज्याचे डझनभर मंत्र्यांनी भेटी दिल्या. केवळ आश्वासने व स्तूती करण्यापलिकडे काहीच झाले नाही.
तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरात ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाला राज्य शासनाने विकसीत करण्यासाठी मंजुरी दिली होती. भंडारा गोंदिया तथा बालाघाट जिल्ह्याच्या सीमा भंडारा जिल्ह्याला भिडल्या असून चांदपूर येथे जागृत हनुमान मंदिर आहे. दरवर्षी येथे लाखो भाविक व पर्यटक येतात. भंडारा जिल्ह्यातील क्रमांक दोनचा चांदपूर जलाशय येथे आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेला हा परिसर येणाऱ्याला भुरळ घालतो. तत्कालीन केंद्रीय पर्यटनमंत्री सुबोधकांत सहाय, महानायक अमिताभ बच्चन तथा अन्य केंद्रीय नेत्यांनी या स्थळाची तोंडभर कौतूक केले.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल दर महिन्याला हनुमानाच्या दर्शनाकरिता येतात हे विशेष. सन २०१२ पर्यंत पर्यटनस्थळाचे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर माशी कुठे शिंकली हे कळलेच नाही. नागपूर येथे मागील हिवाळी अधिवेशनात आ.चरण वाघमारे यांनी प्रश्न मांडून सभागृहाचे ध्यानाकर्षण केले होते. नंतर पर्यटन विकास महामंडळाचे पथक चांदपूर येथे दाखल झाली होती. पथकाने अहवाल राज्य शासनाला सादर केला. परंतु पुढे ठोस कारवाई झाली नाही. सोमवारपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु होत आहे. या अधिवेशनात आ.वाघमारे यांनी तडा लावण्याची गरज आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीत अनेक पर्यटनस्थळे येतात. त्यामुळे तितका निधी देणे शक्य होत नाही. असे समजते.
येथे केंद्रातून निधी खेचून आणण्याची गरज आहे. खा.नाना पटोले यांची भूमिका येथे महत्वाची ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)