नळाला पाणी येण्याची शक्यता धूसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 00:16 IST2017-05-21T00:16:00+5:302017-05-21T00:16:00+5:30

सूर नदीचे खमाटा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना कारीत असलेल्या वरठीवासियांची नळाला पाणी येण्याची शेवटची आशा मावळली आहे.

The chances of getting water in the tap are gray | नळाला पाणी येण्याची शक्यता धूसर

नळाला पाणी येण्याची शक्यता धूसर

इंटेकवेल पडले कोरडे : गाळ उपसूनही पाणी नाही
वरठी : सूर नदीचे खमाटा नदीपात्र कोरडे पडल्यामुळे भीषण पाणी टंचाईचा सामना कारीत असलेल्या वरठीवासियांची नळाला पाणी येण्याची शेवटची आशा मावळली आहे. ४० फूट खोल इंटेकवेलमध्ये साचलेली गाळ उपसल्यावरही पाण्याचा स्त्रोत लागला नाही. त्यामुळे पाऊस किंवा धरणातील पाणी सोडल्याशिवाय नळाला पाणी येणार नाही. किमान दोन दिवसाआड पिण्याचे पाणी येईल, ही शक्यताही धुसर झाली आहे. आता पाऊस आल्याशिवाय नळाला पाणी मिळणे शक्य नाही.
चार दिवसांपासून इंटेकवेलचे गाळ उपसणे सुरू आहे. ग्रामपंचायतचे सर्वच कर्मचारी पुढाकार घेऊन गाळ उपसत आहेत. जवळपास ६ ते ७ फुटपर्यंत गाळ उपसण्यात आले. परंतु शेवटपर्यंत पाणी लागले नाही. नदीपत्रात पाणी नाही. अशा स्थितीत जमिनीच्या आतील पाण्याचे स्रोत पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपयोगी पडतात. परंतु गाळ उपसूनही पाण्याचा शोध न लागल्यामुळे पाणी टंचाईच्या नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहल्याखेरीज उपाय नाही अशी बिकट परिस्थिती वरठीवासियांवर आली आहे. सद्यस्थितीत पूर्ववत पाणी पुरवठा सुरू होण्यासाठी दमदार पावसाशिवाय पर्याय नाही. इंटेकवेल उपसून पाणी न लागल्यामुळे स्त्रोताच्या सर्व शक्यता संपल्या आहेत.
बांधकाम बंद ठेवण्याचे आवाहन
गावात मोठ्या प्रमाणात घराचे बांधकाम सुरू आहेत. नवीन घराच्या बांधकामासाठी पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे बांधकाम ठेवणे आवश्यक आहे. १५ दिवस तरी किमान पाऊस येणार नाही. त्यामुळे गावात सुरू असलेले बांधकाम काही दिवस बंद ठेऊन पाणी टंचाईच्या स्थितीवर मात करता येऊ शकते. त्यामुळे ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच संजय मिरासे व उपसरपंच मिलिंद रामटेके यांनी केले आहे.

विहिरींचा जलस्रोत घसरला
पाण्याचा स्त्रोत आटल्यामुळे सहा दिवसांपासून सुरू असलेली पाणी टंचाई व उष्णता असल्यामुळे विहिरीसह हातपंपावर गर्दी वाढली आहे. परिणामी अनेक भागतील विहिरी शेवटच्या घटका मोजत आहेत. सार्वजनिक विहिरीत भरपूर पाणी आहे, परंतु पाणी पिण्यायोग्य नाही. गावात असलेल्या बोरवेल्स आटण्याच्या स्थितीत आहेत. वरठी येथे असलेल्या अनेक भागातील विहिरी नावापुरते आहेत. २५.३० फूट खोल विहिरीत फूट - दोन फूट पाणी आहे. अनेक भागात खडक पाण्याच्या स्रोताला अडथळा ठरत आहेत. पाण्याचा नियमित उपसा वाढल्यामुळे अनेक विहिरी आटल्या आहेत. घरी विहीर असूनही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वरठी येथील सुभाष व शास्त्री वॉर्डात अनेक विहिरी नावापुरत्या उरल्या आहेत. पाण्याचा अपव्यय केल्यामुळे काय परिणाम होऊ शकतो हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसून येत आहे.
पाण्याचा दुरूपयोग टाळल्याशिवाय पर्याय नाही
पाणी टंचाईच्या परिस्थितीत वरठीत दोन प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यांच्याकडे पाणी मुबलक आहे, ते निशचिंत आणि ज्यांच्याकडे नाही ते चिंतेत आहेत. दमदार पावसाची सुरुवात झाली नाही तर सर्वांनाच पाणी टंचाईचा फटका बसू शकतो. एकाचवेळी मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याच्या उपस्यामुळे पाण्याची पातळी खोल गेली. त्यामुळे या परिस्थितीत सर्वांनी पाणी जपून वापरल्याशिवाय पर्याय नाही. अजूनही काही भागात पाण्याचा अपव्यय सुरू असून दुसऱ्या भागातील लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

Web Title: The chances of getting water in the tap are gray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.