साकोली जलाशयात लडाखमधील चक्रवाक पक्षी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:32 IST2021-03-07T04:32:39+5:302021-03-07T04:32:39+5:30
साकोली : निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या भंडारा जिल्ह्यातील जलाशयात सध्या परदेशी पाहुण्या पक्ष्यांची मांदियाळी बघावयास मिळत आहे. साकोली येथील ...

साकोली जलाशयात लडाखमधील चक्रवाक पक्षी
साकोली : निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या भंडारा जिल्ह्यातील जलाशयात सध्या परदेशी पाहुण्या पक्ष्यांची मांदियाळी बघावयास मिळत आहे. साकोली येथील जलाशयात लडाखमधील चक्रवाक पक्ष्याचे दर्शन झाल्याने पक्षिमित्र सुखावले आहेत. सध्या पक्षी निरीक्षणासाठी पक्षिमित्रांची तलावांवर गर्दी होत असल्याचे दृश्य दिसत आहे.
साकोली तालुक्यात मोठ्या प्रमाणात तलाव असून लगत अभयारण्य आहे. त्यामुळे विविध पाहुणे पक्षी साकोली तालुक्यातील जलाशयात आश्रयाला येतात. सध्या चक्रवाक पक्षी दोन हजार किमीचे अंतर पार करून साकोली तालुक्यात दाखल झाला आहे. उत्तरेकडील काश्मीर आणि लडाखमधील जलाशयात चक्रवाक पक्ष्यांची विण होते. हिवाळ्यात या भागात बर्फवृष्टी झाली की चाऱ्याची समस्या निर्माण होते. परिणामी चक्रवाक पक्षी स्थलांतर करतात. हा पक्षी आकाराने बदकाएवढा असतो. तो नेहमी जोडीने तर कधी कधी थव्याने आढळून येतो. थव्यातही त्यांची संख्या खूप अधिक नसते. या पक्ष्यात नर-मादी भेद ओळखणेही कठीण जाते.
गाद गवताचे कोंब, जलाशयातील शंख-शिंपल्यातील मऊ प्राणी, चिखलातील कीटक या चक्रवाक पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. मानेचा रंग भुरकट पांढुरका पिवळसर असून शेपूट आणि पंखाचा काही भाग काळा असतो. असा हा पक्षी सध्या साकोली तालुक्यातील जलाशयात वास्तव्यास असल्याची माहिती पक्षी निरीक्षक विनोद भोवते यांनी दिली आहे.
बॉक्स
पक्षी संवर्धनाची गरज
साकोली तालुक्यातील जलाशयात विविध पाहुणे पक्षी दरवर्षी दाखल होतात. या पक्ष्यांनी तलावाचे सौंदर्य खुलून जाते. मुबलक चारा मिळत असल्याने हे पक्षी येथे येतात. परंतु अलीकडे शिकाऱ्यांची नजर या देखण्या पक्ष्यांवर गेली आहे. त्यामुळे या पक्ष्यांचे संवर्धन करण्याची गरज आहे. पक्षिमित्र आपल्या परीने पक्ष्यांचे संवर्धन करतात. परंतु शासकीय स्तरावर कोणताही पाठपुरावा होताना दिसत नाही.