सिमेंट रस्ते झाले भ्रष्टाचाराचे कुरण

By Admin | Updated: January 29, 2015 23:01 IST2015-01-29T23:01:51+5:302015-01-29T23:01:51+5:30

आठ ते दहा दिवसात सिमेंट रस्ता बांधायचा, लगेच बिल काढायचे, मात्र गुणवत्तेची लक्तरे वेशीवर टांगायची. इस्टीमेटचा उपयोग केवळ निधी मंजुरीसाठी करायचा. मोजमाप पुस्तिकेत

Cement roads become corrupt | सिमेंट रस्ते झाले भ्रष्टाचाराचे कुरण

सिमेंट रस्ते झाले भ्रष्टाचाराचे कुरण

रवींद्र चन्नेकर - बारव्हा
आठ ते दहा दिवसात सिमेंट रस्ता बांधायचा, लगेच बिल काढायचे, मात्र गुणवत्तेची लक्तरे वेशीवर टांगायची. इस्टीमेटचा उपयोग केवळ निधी मंजुरीसाठी करायचा. मोजमाप पुस्तिकेत इस्टीमेटप्रमाणे नोंदी घ्यायच्या. असा प्रकार लाखांदूर तालुक्यात सुरु असून तीन वर्षात बांधलेले सिमेंट रस्ते बेपत्ता झाल्याचे दिसत आहे. जणू विविध विकास योजनातून बांधण्यात येणारे सिमेंट रस्ते भ्रष्टाचाराचे कुरण झाले आहे. वरिष्ठ स्तरावरून चौकशी केल्यास मोठे मासे यात गळाला लागू शकतात.
लाखांदूर तालुक्यात गेल्या तीन वर्षात गावागावात कोट्यावधी रुपये खर्च करून सिमेंट रस्त्याचे निर्माण करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषदेअंतर्गत, पंचायत समितीच्या माध्यमातून गावागावात सिमेंट रस्ते निर्माण करण्यात आले. दलित वस्ती सुधार योजना, तांडा वस्ती सुधार योजना, १३ वा वित्त आयोग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना, आमदार, खासदार, निधी, पंचायत समिती, सदस्य, विकास निधी (ग्रामपंचायतीचा निधी) यातून या रस्त्यांचे बांधकाम केले जात आहे. वर्षभरापूर्वी सिमेंट रस्ते बांधताना त्यात लोखंडी गजांचा वापर केला जात होता. परंतु आता सरळ काँक्रीट टाकून रस्ते बांधले जात आहे.
नियमाप्रमाणे ८० बाय ४० एमएमचा मोठा, गिट्टा १०-१२ एमएमची गिट्टी असे तीन घरांची दबाई करून त्यावर ११ इंच जाडीचा सिमेंटचा रस्ता तयार करावा लागतो. दर्जेदार शासन मान्य कंपनीचे, सिमेंट, नदीतील स्वच्छ रेतीआणि रस्त्यावर कॅरी करून पाणी मारावे लागते.
या पद्धतीने सिमेंट रस्ता तयार केल्यास पाच वर्षे कुठेही खड्डा पडत नाही. परंतु मागील काही वर्षापूर्वी बांधलेल्या रस्त्यांची अवस्था या सर्व नियमांना तडा देणारी आहे. बांधकामानंतर दोन ते महिन्यात तर काही रस्ते सहा महिन्यात उखडले आहेत. वर्षभरानंतरच येथे सिमेंट रस्ता होता असे सांगावे लागते .
बांधकाम करताना निकृष्ट वळू, हलक्या दर्जाचे सिमेंट आणि कांक्रीट तयार करताना सिमेंटचा वापर कमी तर रेतीचा उपयोग जास्त केला जातो. पाणी मारण्याच्या नावाखाली सिमेंट व गिट्टी एकत्र करण्यासाठी वापरले जाईल तेवढेच पाणी असते. या सर्व प्रकाराने रस्त्याची वाट लागली आहे. यासोबतच निधीचाही अपव्यय होत आहे.
कोणताही कंत्राटदार सिमेंट रस्त्याचे कंत्राट घेण्यासाठी उड्या मारतात. लोकप्रतिनिधी आपल्या डमी ठेकेदाराच्या माध्यमातून कंत्राट घेतात. केवळ आठ ते दहा दिवसात रस्त्याची निर्मिती केली जाते. लगेच त्याचे बिलही काढले जाते.
कमी श्रमात अधिक पैसे कमाविण्याचा सिमेंट रस्ता एक सोपस्कर मार्ग झाला आहे. काही महिन्याअगोदर लाखांदूर तालुक्यातील चिकना, बोथली, बारव्हा गावात सिमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे बोलले जात आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला कोणत्याच अधिकाऱ्याला वेळ नसल्याचे दिसून येते. वरिष्ठांनी लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येऊ शकते.

Web Title: Cement roads become corrupt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.