होळी पेटवून नव्हे वृक्ष पूजनाने साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:33 IST2021-03-28T04:33:42+5:302021-03-28T04:33:42+5:30
होळी हा खरा तर आनंदाचा सण. होळी पेटवायची ती दृष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी. होळीत जळून गेलेल्या असत्य प्रवृत्तीनंतर तावूनसलाकून ...

होळी पेटवून नव्हे वृक्ष पूजनाने साजरी करा
होळी हा खरा तर आनंदाचा सण. होळी पेटवायची ती दृष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी. होळीत जळून गेलेल्या असत्य प्रवृत्तीनंतर तावूनसलाकून निघालेल्या सत्प्रवृत्तीचे. आपला प्रत्येक सण हा प्रतीकात्मक आहे. होळीची पूजा म्हणजे दृष्टप्रवृत्तीचे दहन आणि सत्प्रवृत्तीचे पूजन असते. परंतु अलिकडे या होळीलाही वेगळाच रंग लागला आहे. वारेमाप वृक्षतोड करून होळी पेटविली जाते. प्रत्येक गावात एक दोन होळी पेटते. एका होळीत एक क्विंटल लाकडे, जळत असतील तर एकट्या भंडारा जिल्ह्यातच हजारो क्विंटल लाकूड भस्मसात होते. यातून प्रदूषणाचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. पूर्वी होळीमध्ये शेणापासून तयार केलेल्या चाकोल्या आणि ग्रामसफाईतून आलेला केरकचरा जाळला जायचा. मात्र आता थेट वृक्ष तोडून होळी पेटविली जाते. हा प्रकार खरे तर टाळण्याची गरज आहे. होळी पेटविण्याऐवजी होळीच्या दिवशी एका कुंडीत सार्वजनिक ठिकाणी वृक्ष ठेवून त्याचे पूजन करावे, यातून पर्यावरणाचा संदेश देणे सोपे जाईल. यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. खुशी बहुउद्देशीय फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश राऊत म्हणाले, होळीच्या नावाखाली चाललेली झाडांची कत्तल वेळीच थांबायला हवी, वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्निंगला प्रभावी उत्तर असल्याचे त्यांनी सांगितले.
बॉक्स
धूलिवंदन साधेपणाने साजरे करा - वसंत जाधव
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव बघता सर्वांनी धूलिवंधन हा सण अगदी साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे. नागरिकांनी सण, उत्सव शांततेत साजरे करावे, जातीय सलोखा टिकवून ठेवावा, रंगाचे दुष्परिणाम आणि कोरोनाचा प्रादुर्भाव याची जाण ठेवून मोठ्यांनी आपल्या मुलांना घराबाहेर पडू देऊ नये, एवढेच नाही तर तरुणांनी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये, अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी, असा अनुचित प्रकार करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल. आपल्या परिसरात असे घडत असल्यास तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी केले आहे.
कोट
कोरोना संसर्ग वाढत असल्याने होळी, धुळवड नागरिकांनी अगदी साधेपणाने साजरी करावी. प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, होळीत गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे हा सण अतिशय साधेपणात साजरा करा.
-संदीप कदम, जिल्हाधिकारी भंडारा.