रक्तदान करून आंबेडकर जयंती साजरी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:35 IST2021-04-08T04:35:28+5:302021-04-08T04:35:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. शासन आपल्या ...

रक्तदान करून आंबेडकर जयंती साजरी करा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यामध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. भंडारा जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. शासन आपल्या स्तरावर उपाययोजना करत आहे. रुग्णसंख्या वाढतच असल्यामुळे राज्यात रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे. शासनाला मदत करण्याकरिता १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काॅंग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपापल्या तहसील, शहर, ग्रामस्तरावर रक्तदान शिबिराचे आयोजन करून महामानवाला अभिवादन करण्याचे आवाहन जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले आहे.
जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरु आहे. शासनाने प्रतिबंधक उपाय म्हणून भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, शहरात व गावामध्ये कोविड चाचणी व लसीकरणाचे शिबिर आयोजित केले आहे. शासन आपल्यापरिने शक्य ती मदत करत आहे. परंतु, अजूनही लोकांमध्ये लसीकरणाबाबत संभ्रम आहे. कोविडची लस घेण्याकरिता व चाचणी करण्याकरिता जनतेला प्रोत्साहित करणे, लोकांमध्ये जनजागृती करण्याकरिता काॅंग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या शहर, तहसील व ग्रामस्तरावर प्रयत्न करावेत व जनतेला चाचणी व लस घेण्याकरिता मदतकार्य करावे, असे आवाहन जिल्हा काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई यांनी केले आहे.