राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 22:58 IST2019-04-01T22:58:08+5:302019-04-01T22:58:26+5:30
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तुमसरजवळील खापा चौकात ११ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तुमसर - भंडारा, मन्सर व गोंदिया रस्त्यावर सदर कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.

राष्ट्रीय महामार्गावर सीसीटीव्हीची नजर
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तुमसरजवळील खापा चौकात ११ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तुमसर - भंडारा, मन्सर व गोंदिया रस्त्यावर सदर कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार आहे.
तुमसर शहरात प्रवेश करणारा तथा मन्सर-गोंदिया राष्ट्रीय महामार्ग व तुमसर-बालाघाट आंतरराज्यीय महामार्गावरील खापा या प्रमुख चौकात पोलीस प्रशासनाने सध्या ११ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. सदर कॅमेरे कार्यान्वित झाले आहे. चौकातील प्रत्येक घटनेवर या कॅमेऱ्यांची नजर आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याने त्यांचे महत्व वेगळे आहे.
तुमसर शहरात प्रवेश करताच सीसीटीव्ही कॅमेरे दिसून येतात. पोलीस प्रशासनाने कॅमेरे बसविल्याने गृह विभागाने ही निवडणूक गांभिर्याने घेतल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाचे तसे निर्देश पोलीस विभागाला देण्यात आल्याचे माहिती आहे. आंतरराज्यीय तस्करी, देशी दारुची वाहतूक, रोकड व इतर अवैध बाबींचा वापर निवडणुकीत होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. खापा चौकात आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. त्याचे लवकरच उद्घाटन होणार आहे.