विजेअभावी नागरिकांचे हाल
By Admin | Updated: July 16, 2015 00:59 IST2015-07-16T00:59:47+5:302015-07-16T00:59:47+5:30
करडी परिसरातील नागरिक सध्या भारनियमनाने त्रस्त आहेत. विद्युत विभागाकडून सकाळी ९ ते दुपारी ४ वाजतापर्यंत विजेचा पुरवठा बंद केला जात असल्याने ....

विजेअभावी नागरिकांचे हाल
करडी (पालोरा) : करडी परिसरातील नागरिक सध्या भारनियमनाने त्रस्त आहेत. विद्युत विभागाकडून सकाळी ९ ते दुपारी ४ वाजतापर्यंत विजेचा पुरवठा बंद केला जात असल्याने कृषी, व्यापार, उद्योग व सेवा क्षेत्रांना जबर फटका बसत आहे. आर्थिक व व्यावसायीक नुकसानीने तीव्र उकाड्याने नागरिकांचे बेहाल होत आहे. त्वरित भारनियमन बंद करून सेवा २४ तास वीज देण्याची मागणी सर्व क्षेत्रातून होत आहे.
मागीलवर्षी दमदार पावसामुळे आषाढ महिन्यात रोवणीच्या कामाला सुरूवात झालेली होती. मात्र यावर्षी सुरूवतीच्या पावसानंतर सर्वत्र हाहाकार माजला आहे. पाऊस बेपत्ता असून पऱ्हे करपली. तलाव, नाले आदी पाण्याविणा जेमतेम भरली. ज्या शेतकऱ्यांकडे तलाव बोरवेल्स आहेत त्यांनी रोवणीस प्रारंभ केला मात्र भारनियमनामुळे तेही खोळंबली. पऱ्हे वाचविण्यासाठी सुद्धा विजेचा उपयोग होत नसल्याने आधीच धानाच्या कमी भावाने मोडलेला शेतकरी राजकारण्यांचे नावे ओरडू लागला आहे.
सेवा, उद्योग, व्यापाऱ्याला फटका
ग्रामीण भागात तुरळक प्रमाणात उद्योग व व्यापार केला जातो. पिक गिरण्या, धान गिरण्यात अन्य व्यवसाय भारनियमनाने दिवसभर बंद असतात. व्यवसाय करायचा कसा असा प्रश्न त्यांचेकडून विचारला जात आहे. उद्योगावर आधारित व्यापारही त्यामुळे अडचणीत सापडले असून मजुरांवर उपासमारीची वेळ आहे. सेवा क्षेत्र सुद्धा गर्मीने बेहाल असून बँक, शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालये, विद्यार्थी व नागरिक त्रस्त आहेत. सकाळच्या पाळीत शाळा सुरू करण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे तर उद्योग व व्यापार सुरळीत होण्यासाठी भारनियमन बंद करण्याची अपेक्षा संबंधितांची आहे.पावसाळ्याच्या वातावरणात तीव्र गर्मी विविध आजारांना आमंत्रण देणारी ठरली असून हगवण, उलटी, मलेरिया, दूषित पाण्याच्या रोगांनी हातपाय पसारले आहेत. भारनियमनामुळे शुद्ध पिण्याच्या पाण्याचा अपुरा पुरवठा होत असून नळ योजना अडचणीत सापडल्या आहेत. रात्रीच्या वेळी सुद्धा केव्हाही विद्युत पुरवठा खंडीत केला जात असल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे. विद्युत विभागाने नागरिकांच्या जीवाशी खेळणे बंद करावे, सेवा पुर्ववत करण्याची आवश्यकता सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.(वार्ताहर)
काही जलविद्युत प्रकल्पाचे संच बंद पडले आहेत. मागणी अचानक वाढली आणि पुरवठा अपुरा होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून भारनियमनाचे आदेश असतात. या संदर्भाने तत्काळ उपाय योजना म्हणून ग्रामीण व शहरी भागातही विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे भारनियमन केव्हापर्यंत बंद होणार सध्यातरी सांगता येत नाही.
- ज्ञानेश्वर लांडे,
कनिष्ठ अभियंता, विद्युत वितरण कंपनी शाखा करडी.