अर्ध्या एकरात लागवड केलेली फुलकोबी सडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:36 IST2021-04-24T04:36:12+5:302021-04-24T04:36:12+5:30
सिल्ली येथील शेतकरी रामदास पडोळे यांची नुकसानभरपाईची मागणी सिल्ली : जिल्ह्यात २२ मार्चपासून ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात ...

अर्ध्या एकरात लागवड केलेली फुलकोबी सडली
सिल्ली येथील शेतकरी रामदास पडोळे यांची नुकसानभरपाईची मागणी
सिल्ली : जिल्ह्यात २२ मार्चपासून ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. मात्र मागील आठवड्यापासून कडक लॉकडाऊन पाळण्यात येत असल्याने भाजीपाला विक्रीवर बंदी आली. त्यामुळे सिल्ली येथील शेतकरी रामदास पडोळे यांच्या अर्ध्या एकरातील फुलकोबी व १ एकरातील टमाटर आता सडण्याच्या मार्गावर असून, फुलकोबी तर पूर्णत: वाया गेली आहे. यामुळे सदर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाल्याने प्रशासनाने आर्थिक मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रामदास पडोळे यांनी केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कडक निर्बंध लावून केवळ अतिआवश्यक व गरजेच्या कामाला सोडून सर्वच ठिकाणी कडक लॉकडाऊन घोषित केला. राज्य शासनाच्या निर्देशानंतर ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. भंडारा तालुक्यातील सिल्ली या ग्रामीण भागात शेतकरी रामदास पडोळे आपल्या शेतात मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याची लागवड करतात. बाजार बंद असल्याने सदर भाजीपाल्याची विक्री कुठे करावी, असा प्रश्न त्यांना पडला आहे. सध्या पडोळे या शेतकऱ्याच्या शेतात फुलकोबी व टमाटर पडून असून, अर्ध्या एकरात लागवड केलेली फुलकोबी तर पूर्णत: सडली आहे तर एक एकरातील टमाटर बांधावरच सडण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या भाजीपाल्याची नुकसानभरपाई प्रशासनाने द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी रामदास पडोळे यांनी केली आहे.