एटीएममधून रोकड उडविली
By Admin | Updated: June 18, 2014 23:55 IST2014-06-18T23:55:16+5:302014-06-18T23:55:16+5:30
येथील भारतीय स्टेट बँकेच्या दोन खातेदारांच्या ‘एटीएम’मधून अनुक्रमे १० हजार, ५,७३१ रूपये काढण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पहिल्या खात्यातून पैसे उचलले तर दुसऱ्या खात्यातून खरेदीचे बिल

एटीएममधून रोकड उडविली
तुमसर येथील प्रकार : १५ हजार ७३१ रूपये काढले
तुमसर : येथील भारतीय स्टेट बँकेच्या दोन खातेदारांच्या ‘एटीएम’मधून अनुक्रमे १० हजार, ५,७३१ रूपये काढण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पहिल्या खात्यातून पैसे उचलले तर दुसऱ्या खात्यातून खरेदीचे बिल चुकविले आहे. या दोन्ही खातेदारांनी तुमसर पोलिसात तक्रार केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
दि.१० जून रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास चंद्रशेखर वानखेडे रा.खापा खाते क्रमांक ११३६५५६६३७७ नवीन बसस्थानकाजवळील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये १० हजार रूपये काढण्याकरीता गेले. त्यांना ‘नो ट्रान्झीक्शन’ दाखविल्यावर ते परत निघाले, त्यानंतर बँकेत जावून शोध घेतला असता दुसऱ्यानेच पैसे काढल्याचे त्यांना कळले. ही माहिती व्यवस्थापकांना दिल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार करण्याचे सांगितले.
दि.१६ जून रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास धीरज सेलोकर रा.तुमसर हे खाता क्रमांक ३११६०७८४७८४ मधून ५,७३१ रूपये कमी झाले. त्यांनी याबाबत बँकेतून माहिती घेतली असता ५७३१ रूपयांची शॉपींग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परंतु सेलोकर यांनी शॉपिंग केली नाही. त्यांनीही तुमसर पोलिसात तक्रार केली आहे. या आरोपीने १०, २५००, २४९९ व ७०० रूपयांची खरेदी केल्याचे दिसून आले आहे.
भारतीय स्टेट बँकेच्या एटीएमच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत, सुरक्षारक्षक नाहीत. एटीएममधून कोणीही असे पैसे काढत असल्यामुळे एटीएम धारकांमध्ये धास्ती भरली आहे. त्यामुळे एटीएम मध्ये पैसे ठेवायचे की नाही असा प्रश्न खातेधारकांना पडला आहे.
शहरात सायबर क्राईम करणारी टोळी सक्रीय झाल्याचे दिसते. यापूर्वी मोठ्या शहरात सायबर क्राईम घडले आहेत. लहान शहरात या टोळ्यांनी तर शिरकाव केला नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जात असून अज्ञात आरोपीविरूद्ध सायबर गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)