बाह्मणीत घरकुलांचा घोळ !
By Admin | Updated: May 8, 2015 00:43 IST2015-05-08T00:42:28+5:302015-05-08T00:43:21+5:30
घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते.

बाह्मणीत घरकुलांचा घोळ !
तुमसर : घर नाही अथवा हक्काचे असलेले घर मोडकळीस आले तर शासन घरकुलाकरिता निधी देते. परंतु बाम्हणी (माडगी) येथे गरजूंना घरकुल मंजूर झाले नाही. उलट श्रीमंतांना घरकुल देण्यात आले. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली तर मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता आहे.
वैनगंगा नदी काठावर बाम्हणी (माडगी) हे तीन ते साडे तीन हजार लोकवस्तीचे जुने गाव आहे. या गावात शेतकरी कुटुंब तथा मोलमजूरी करणारे ओबीसी, कोळी, दलित बांधव राहतात. परंतु ते मुख्य प्रवाहापासून वंचित आहेत.
बाम्हणी येथे ग्रामपंचायत कार्यालयापासून केवळ चार फूटावर प्रल्हाद श्रावण सेलोकर (४८) यांचे कुटुंब पडक्या झोपडीत वास्तव्याला आहे. कुटुंबात प्रल्हाद, तयंच्या पत्नी मीरा व मुलगी मीना (१७) यांचा समावेश आहे. दोन मुलींचे लग्न झाले. तुमसर येथे हे कुटुंब कंत्राटदाराजवळ कामावर जाते. मुलगी मीनाने इयत्ता १२ वी ची परीक्षा दिली आहे. या कुटुंबाचे नाव दारिद्र्य रेषेखालील यादीत आहे. सवलतीच्या दरात अन्नधान्य मिळते. घरी शौचालय नाही. घरकुलाकरिता अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केवळ आश्वासने दिली. घर केव्हा कोसळेल या भितीने त्यांना ग्रासले आहे. दोन पिढ्या या घरात राहत होत्या. घरी शेती नाही. पुरात एकदा घर पडले होते. तेव्हा शासनाने दोन हजाराची आर्थिक मदत दिली होती. नियमित ग्रामपंचायतीला घरकर देत आहे. दोन वर्षापूर्वी गावात १० ते १२ घरकुल देण्यात आले. परंतु आम्ही त्यापासून वंचित राहिलो. अशी तक्रार प्रल्हाद सेलोकर यांनी दिली. दुसरे कुटुंब ईस्तारू मोडकू मेश्राम (६६) आंबेडकर वॉर्डात राहतात. त्यांना एक मुलगा दोडकू (३२) आहे. त्यांना दोन मुले आहेत. कोळी समाज बांधव असलेले मेश्राम कुटुंबियांचे सुद्धा पडक्या स्थितीत आहे. अनेकदा विनंती घरकुलाकरिता केली. परंतु घरकुल मंजूर केले नाही.
आयुष्यात शेवटच्या टप्प्यावर सुद्धा गावात घरकुल मिळाले नाही अशी खंत इस्तारू मेश्राम यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष यास कारणीभूत असल्याची तक्रार त्यांनी व्यक्त केली. घरात वास्तव्य करताना सतत भिती वाटते अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
रविंद्र तेजराम चावके यांची झोपडी शेवटची घटका मोजत आहे. ठिकठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या भेगा पडल्या आहेत. चावके यांच्या कुटुंबात दोन मुले व पत्नी आहे. घर केव्हा कोसळेल याचा नेम नाही. चावके सुद्धा हातावर आणून पानावर खातात.
बाम्हणी येथे दलित बांधवांची १० ते १२ कुटुंब वास्तव्याला आहेत. शासनाचा निधी खास त्यांच्याकरिता राखीव असतो. परंतु या वस्तीत सुद्धा या कुटुंबाकरिता विकास कामे झाली नाहीत. असा आरोप दलित बांधवांनी लावला आहे.
प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत विकासकामांचे नियोजन करण्याचा दावा करते. परंतु गरीब वंचितांना मात्र येथे न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे. (तालुका प्रतिनिधी)