बसची ट्रकला धडक - १३ प्रवासी जखमी
By Admin | Updated: June 16, 2014 23:20 IST2014-06-16T23:20:09+5:302014-06-16T23:20:09+5:30
शेळ्यांचा कळप रस्ता ओलांडताना नागपूर दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाने गती कमी केली असता, मागाहून येणाऱ्या बसने ट्रकला जोरदार धडक दिली. यात बस रस्त्याच्या खाली उतरली.

बसची ट्रकला धडक - १३ प्रवासी जखमी
जवाहरनगर : शेळ्यांचा कळप रस्ता ओलांडताना नागपूर दिशेने जाणाऱ्या ट्रक चालकाने गती कमी केली असता, मागाहून येणाऱ्या बसने ट्रकला जोरदार धडक दिली. यात बस रस्त्याच्या खाली उतरली. बस चालकासह १३ प्रवासी जखमी झाले. ही घटना आज सकाळी १०.३० वाजता सुमारास खरबी नाका राष्ट्रीय महामार्गावर घडली.
अज्ञात ट्रक हा भंडाऱ्याहून नागपुरकडे जात होता. खरबी नाका येथील शेळ्यांचा कळप डावीकडून उजवीकडे बुद्ध विहार दिशेने सकाळी १०.३० वाजता सुमारास रस्ता ओलांडीत होता. अज्ञात ट्रक चालकाने ट्रकची गती कमी केली. त्या दरम्यान ट्रकच्या मागाहून येणाऱ्या भंडारा आगाराची २ बाय २ भंडारा-नागपूर निमआराम बस एमएच-०७/सी-९०९७ ने ट्रकला जोरदार धडक दिली. बसचा दर्शनी भागाचा चुराडा झाला. बसचालकाने समयसुचकता दाखवित उताराच्या दिशेने बस वळविली.
ट्रक चालक ट्रकसह घटनास्थळाहून पोबारा झाला. यात चालकासह तेरा प्रवासी जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलीस हवालदार मेंढे, शिपाई राऊत, घटनास्थळी दाखल झाले. जखमींना सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले.
यात बसचालक राधेश्याम खडसे ३७ (भंडारा) प्रवासी, अनसूया भोयर (६५) रा.चकारा, उर्वरित प्रवासी राधेश्याम मेश्राम (५०) रा.कापसी (नागपूर), शलिम शेख (३९) रा.नागपूर, वसंता कावळे (५२) कापसी, संदीप उईके (३२) पारडी, सोनल खेडीकर (२८) लाखनी, योगेशकुमार रामसिंग (१७) न्यु दिल्ली, रोशनी गुप्ता (२०) भंडारा, लता गौर (५४) भंडारा या सर्वांवर प्राथमिक उपचार करून सुटी देण्यात आली.
भंडारा आगाराचे निरीक्षक रमेश गडेकर यांच्या फिर्यादीवरून अती वेगाने व हलगर्जीपणाने बस चालवित बसच्या आतील प्रवासीस जखमी होणार कारणीभूत ठरीत असलेल्या चालक राधेश्याम खडसे यांच्या विरूद्ध जवाहरनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पुढील तपास पोलीस हवालदार नेवालचंद्र टिचकुले करीत आहे. (वार्ताहर)