भाऊ... कोणाचा माणूस बसला गा !

By Admin | Updated: July 16, 2015 00:52 IST2015-07-16T00:52:38+5:302015-07-16T00:52:38+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्याने सर्वच पक्षाचे पाठिराखे ..

Brother ... someone's guy sat down! | भाऊ... कोणाचा माणूस बसला गा !

भाऊ... कोणाचा माणूस बसला गा !

प्रशांत देसाई भंडारा
जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्याने सर्वच पक्षाचे पाठिराखे जिल्हा परिषद परिसरात बुधवारला सकाळपासूनच गर्दी करु लागले होते. दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल गुलदस्त्यात होता. दरम्यान, उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये खलबत्ते सुरू असल्याने कार्यकर्ते एकमेकांना उत्कंठेने विचारताना दिसत होते, भाऊ... काय झालं? कोणाचा माणुस बसला गा? शेवटी निकाल बाहेर आला आणि ही शिगेला पोहोचलेली उत्कंठा संपली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या धीरगंभीर चेहऱ्यांवर हास्य फुलून ढोलताशांचा गजर, गुलाल उधडणे व फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.
बुधवारला भंडारा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती. या निवडणुकीकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या होत्या. काँग्रेस व राष्ट्रवादीची सत्ता बसेल असे वाटत होते. मात्र, गोंदिया जिल्हा परिषदेत भाजप व काँग्रेसने हातमिळवणी करून राष्ट्रवादीला सत्तेबाहेर ठेवले. त्यामुळे बुधवारला भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या होत्या. किंबहुना सर्वच पक्षाचे पाठिराखे सकाळपासूनच जिल्हा परिषद परिसरात गर्दी केली होती. दुपारी ४ वाजेपर्यंत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचे काय झाले हे कोणालाच कळायला मार्ग नव्हता. त्यामुळे बाहेर असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये दुपारपर्यंत खलबत्ते सुरू होते.
गोंदिया जिल्हा परिषदेतील निकालानंतर राजकीय पक्षाचे वातावरण ढवळून निघाले होते. गोंदियाची पुनरावृत्ती भंडारा येथे होईल, यावर अनेकांनी शर्यती लावल्या होत्या. दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्यांना दोन दिवसापूर्वी देवदर्शनासाठी पाठविले. सर्वच उमेदवार बुधवारला सकाळी १२ वाजताच्या सुमारास वाहनांमधून जिल्हा परिषदमध्ये दाखल झाले. राजकीय वातावरणाची पार्श्वभूमी ओळखून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कर्मचारी वगळता कुणीच आत जावू शकत नव्हता. चोख पोलीस बंदोबस्तामुळे कार्यकर्त्यांना परिसरातील छोट्या हॉटेल व झाडांच्या आश्रयाने निकालाची वाट बघावी लागली होती. सभागृहात काय चालले हे कोणालाच कळत नव्हते. त्यामुळे एखाद्या पक्षात वरिष्ठ जबाबदारी सांभाळणाऱ्यांच्या सभोवती सामान्यांचा गराडा दिसून येत होता. त्यांचा फोन वाजला किंवा ते फोनवर बोलत असले तरी, बाजुचे नागरिक व सामान्य कार्यकर्ता त्यांना उत्कंठेने भाऊ काय झाल? म्हणून विचारताना दिसत होते. सायंकाळी ४ वाजेपर्यंत निवडणूक परिसरात असाच प्रकार बघायला मिळाला होता. याठिकाणी पक्षाचा छोटा कार्यकर्ता असता तरी तो, पांढरा पेहराव व खांद्यावर दुप्पटा अशा वेशभुषेत बघायला मिळाला.
सभागृहातील निकालाची सर्वांनाच उत्कंठा लागली असल्याने या परिसरात असलेल्यांचे फोन वरचेवर खणखणत होते. सर्वांनाच कोणता पक्ष सत्तेत येणार व कोण अध्यक्ष व उपाध्यक्ष बनेल याकडे लक्ष लागले होते. दरम्यान, सभागृहाबाहेर एखादा सदस्य बाहेरही दिसला तरी, त्यालाही भाऊ... काय झाल? कोणाचा अध्यक्ष व उपाध्यक्ष झाला? असे विचारणे सुरू होते.
घड्याळाचे काटे जस जसे पुढे सरकत होते. तसतसे निकाल ऐकण्यासाठी अनेकांच्या चेहऱ्यावर उत्कंठा व चेहरे धीरगंभीर बनत चालले होते. आणि कार्यकर्त्यांची दिवसभराची उत्कंठा तेव्हा भांड्यात पडली, जेव्हा काँग्रेस व राष्ट्रवादीचा विजय झाला याची गोड बातमी बाहेर आली. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यांवर हास्य फुलले. तर दुसरीकडे भाजपाच्या कार्यकर्त्यांचे चेहरे हिरमुसले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘घड्याळ’ ने व काँग्रेसच्या ‘पंजा’ ने या निवडणुकीत करामत केल्यागत विजय झाला. या विजयी वार्तेने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हातात झेंडा घेऊन नारे देत होते. यावेळी गुलालाची उधळण करून वाद्याच्या तालावर सर्वच बेधुंद होऊन थिरकताना दिसले. या विजयाने दोन्ही पक्षाला बसलेली मरगळ दूर सारण्यासाठी संधी आली असून यामुळे एकप्रकारे पक्षाला नवसंजिवनी मिळाल्याची प्रचिती सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.

Web Title: Brother ... someone's guy sat down!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.