जैवविविधतेसाठी झटताहेत ‘त्यांचे’ हात

By Admin | Updated: November 26, 2014 23:00 IST2014-11-26T23:00:07+5:302014-11-26T23:00:07+5:30

मागील काही वर्षांपूर्वी नैसर्गिक प्रकोपाच्या तडाख्यातून सावरलेले पाचशे लोकवस्तीचे केसलापुरी हे गाव आता जलजैवविविधतेसाठी सरसावले आहे. भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ

Breathing their biodiversity 'their' hands | जैवविविधतेसाठी झटताहेत ‘त्यांचे’ हात

जैवविविधतेसाठी झटताहेत ‘त्यांचे’ हात

केसलापुरीची आदर्श वाटचाल : निसर्ग मंडळ व वन विभागाचा पुढाकार
नंदू परसावार - भंडारा
मागील काही वर्षांपूर्वी नैसर्गिक प्रकोपाच्या तडाख्यातून सावरलेले पाचशे लोकवस्तीचे केसलापुरी हे गाव आता जलजैवविविधतेसाठी सरसावले आहे. भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ आणि भंडारा वनविभागाने या गावाला दिशा देण्यासाठी तेथील ग्रामस्थांमध्ये ऊर्जा पेरली आणि ग्रामस्थ तलावाच्या संवर्धनासाठी झटत आहे.
जंगलात जाणे आणि सरपणासाठी लाकडे आणने असा तेथील ग्रामस्थांचा नित्यक्रम होता. गावालगतचे जंगल आणि तलाव ओसाड होऊ लागले होते. तेथील जैवविविधता नष्ट झाली होती. अशातच भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळ या संस्थेद्वारा मागील २० वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावांचा अभ्यास सुरू होता. दरम्यान चिखलदरा येथे झालेल्या मानद वन्यजीव रक्षकांच्या बैठकीत भंडारा निसर्ग व संस्कृती अभ्यास मंडळाचे पदाधिकारी तथा मानद वन्यजीव रक्षक राजकमल जोब यांनी अभ्यासपूर्ण माहिती सादर केली. त्यानंतर वनविभागाचे तत्कालीन प्रधान सचिव प्रविण परदेशी यांनी मुंबई येथील आयोजित जैवविविधता संवर्धनात काम करणाऱ्या मंडळांच्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी जोब यांना आमंत्रित केले होते. याच सभेत भंडारा जिल्ह्यातील दोन मामा तलावात जैवविविधता पुन:स्थापनेचे काम करण्यासाठी निसर्ग मंडळ व भंडारा वनविभागाला महाराष्ट्र जैवविविधता मंडळातर्फे प्रत्येक तलावासाठी ५ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यानंतर वनविभागाच्या मार्गदर्शनात गावातील जैवविविधता व्यवस्थापन समितीने ही कामे करण्याचे या सभेत ठरविले.
अड्याळ वनक्षेत्रात येणाऱ्या पुरकाबोडीनजिकचे भिवखिडकी हे गाव तलाव फुटल्यामुळे उद्ध्वस्त झाले होते. या गावातील कुटुंब नंतर लागून असलेल्या केसलापुरी येथे स्थानांतरीत झाले. या योजनेत भंडारा तालुक्यातील केसलापुरी आणि खुर्शीपार या दोन गावाला लागून असलेल्या मामा तलावांची निवड करण्यात आली. सोबतच समितीही स्थापन करण्यात आली.
राज्य जैवविविधता मंडळाने दिलेला प्रत्येकी २.५० लाख रूपयांचा हप्ताही समितीच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. प्रारंभी तलावातील बेशरमच्या झाडांचे निर्मूलन करीत सदस्यांनी ही वनस्पती जाळून टाकली. उन्हाळ्यात तलावाचे पाणी कमी होताच, ट्रॅक्टरने नांगरणी करून आसेरा, देवधान आणि खस वनस्पतीची लागवड करण्यात आली. तलावात चिला तसेच लाल, पांढरे कमळही लावण्यात आले. संपूर्ण जैवविविधतेची वाढ होण्यासाठी मरळ, तुंभ, बोटऱ्या आणि अन्य स्थानिक प्रजातीचे मासे सोडण्यात आले. तलाव परिसरात लागवड केलेल्या वनस्पती पाळीव जनावरांकडून फस्त होऊ नये यासाठी या क्षेत्राला काट्याचे कुंपण करण्यात आले आहे.

Web Title: Breathing their biodiversity 'their' hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.