तलावाच्या पाळीला भेगा
By Admin | Updated: August 31, 2015 00:30 IST2015-08-31T00:30:40+5:302015-08-31T00:30:40+5:30
तालुक्यातील मालुटोला येथील माजी मालगुजारी तलावाची पाळ अतिवृष्टीमुळे फुटण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांनी वेळीच त्या खड्ड्यााला रेतीच्या पोती टाकून बुजविला.

तलावाच्या पाळीला भेगा
गावकऱ्यांनीच बुजविला खड्डा : मालुटोला येथील प्रकार
साकोली : तालुक्यातील मालुटोला येथील माजी मालगुजारी तलावाची पाळ अतिवृष्टीमुळे फुटण्याच्या तयारीत असताना गावकऱ्यांनी वेळीच त्या खड्ड्यााला रेतीच्या पोती टाकून बुजविला. अन्यथा तलावाची पाळ फुटून हजारो एकर शेतातील धान वाहून गेले असते. हाच तलाव २००६ ला फुटला होता. तरीही लघुपाटबंधारे विभागाचे या तलावाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
२९ आॅगस्टला तालुक्यात अतिवृष्टीमुळे मालुटोला तलावात पाणीसाठा वाढला. तलावाच्या पाळीला एक मोठे भगदाड पडले. या भगदाडातुन पाणी धो-धो वाहत होते. हा प्रकार रात्रभर सुरु होता. या तलावातील लाखो लिटर पाणी वाया गेले. रात्र असल्यामुळे हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आला नाही.
पहाटे मासेमार बांधव तलावाकडे गेले असता हा प्रकार दिसला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. तलावाच्या पाळीला पडलेल्या भगदाड बुजविण्यासाठी कंबर कसली, प्रशासनाच्या मदतीची अपेक्षा न करताच त्यांनी तात्काळ सिमेंटच्या खाली बॅग गोळा केल्या व त्यात रेती भरुन भगदाड बुजविणे सुरु केले. जवळपास चारशे ते पाचशे बॅग रेतीच्या टाकुन हा भगदाड बुजविला. या घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी निंबार्ते, लघु पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता ईखार हे आपल्या कर्मचाऱ्यासह पोहचले चिंता वाढली आहे. दिवसभर हे भगदाड बुझविण्याचे काम सुरुच होते. (तालुका प्रतिनिधी)
२००६ ला फुटले होते याच तलावाचे वेस्टवेअर
शासनाने तलावाच्या पाण्याची सोय शेतीच्या सिंचनासाठी व्हावा यासाठी या तलावाच्या पाळीला सन १९९५-९६ ला ८० मीटर लांब वेस्टवेअरची बांधणी केली. मात्र या वेस्टवेअरचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने हे वेस्टवेअर सप्टेंबर २००५ चा अतिवृष्टीने पूर्णपणे फुटले होते. त्यामुळे तलावातील पूर्ण पाणी वाया जाऊन शेकडो हेक्टरवर जमीनीतील पीक वाहून गेले होते. त्यावेळी लघुपाटबंधारे विभागाने या वेस्टवेअरची तात्पुरती डागडुगी केली होती. मात्र पुन्हा एकवर्षातच आॅगस्ट २००६ ला अतिवृष्टीत पुन्हा हा वेस्टवेअर फुटला होता. त्याहीवर्षी शेकडो हेक्टरमधील पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता.