The body of the Dholsar youth was finally found | ढोलसरच्या तरूणाचा अखेर मृतदेहच आढळला

ढोलसरच्या तरूणाचा अखेर मृतदेहच आढळला

ठळक मुद्देनाल्याच्या पुरात गेला होता वाहून

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : गणपती विसर्जनासाठी गेलेला तरूण नाल्याच्या पुरात वाहून गेल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील ढोलसर येथे घडली होती. तब्बल तीन दिवसानंतर तरूणाचा मृतदेहच आढळून आला. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
सोमेश्वर देवराम शिवणकर (३२) असे मृत तरूणाचे नाव आहे. गुरूवारी सकाळी ७ वाजता गावातील गणेश विसर्जन मिरवणुकीत सोमेश्वर सहभागी झाला होता. ही मिरवणूक बाच्छेवाडी-मासळ मार्गावरील नाल्यावर गेली होती. मिरवणुकीत शेकडो स्त्री-पुरूष सहभागी झाले होते. गणरायाला निरोप देत असताना काही तरूण नाल्यात उतरले. त्यावेळी सोमेश्वर शिवणकर हा नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला. या घटनेची माहिती पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आली. गावकऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम सुरू होती. मात्र सतत पाऊस पडत असल्याने नाल्याच्या प्रवाहात वाढ झाली होती. त्यामुळे सोमेश्वरचा थांगपत्ता लागत नव्हता. तीन दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. दरम्यान शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास सोमेश्वरचा मृतदेह आढळून आला.
या घटनेची माहिती होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येकजण हळहळ करताना दिसत होते. सोमेश्वर शिवणकरच्या मागे पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. या घटनेची नोंद लाखांदूर पोलिसांनी घेतली आहे. तब्बल तीन दिवस लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी कुरसंगे, मडावी, कुरूडकर, चुटे, वैरागडे शोध मोहिमेत सहभागी झाले होते.

Web Title: The body of the Dholsar youth was finally found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.