तिसऱ्या आघाडीने केली भाजपा-काँग्रेसची दमछाक
By Admin | Updated: October 30, 2015 00:50 IST2015-10-30T00:50:40+5:302015-10-30T00:50:40+5:30
लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होऊ घातली. सर्वच पक्षांनी निवडणुकीत सहभाग घेतला असला तरी...

तिसऱ्या आघाडीने केली भाजपा-काँग्रेसची दमछाक
लाखांदूर : लाखांदूर ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूक होऊ घातली. सर्वच पक्षांनी निवडणुकीत सहभाग घेतला असला तरी तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार उभे केल्याने भाजपा काँग्रेस व शिवसेनेसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चांगलीच दमछाक केल्याने बाजी कोण मारेल याबाबत निश्चितपणे सांगणे कठीण झाले आहे.
१७ प्रभागात सर्वच पक्षाचे १७ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. भाजपा - काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस - शिवसेनेसोबत नगरविकास आघाडीने यात भाग घेऊन चांगलाच वेग पकडला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतवर भाजपाची सत्ता असताना या निवडणुकीत विकास कामांच्या बाबतीत आपली बाजू भाजपा मांडत असली तरी जिल्हा परिषद व पंचायत समितीत जनतेने दिलेला कौल या निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने द्यावा ही काँग्रेसची मागणी मतदारांपुढे केल्याचे दिसून येते.
माजी केंद्रीय मनत्री व खासदार प्रफुल पटेल यांचे नेतृत्वात संपूर्ण तालुक्यात विकासाची गंगा आणून नगरपंचायतमध्ये विकासाची भूमिका राष्ट्रवादीने ठेवली आहे.
तालुका शिवसेनेची बाजू सध्या नव्याने शिवसेनेत प्रवेश केलेले माजी जि.प. अध्यक्ष अॅड.वसंता एंचिलवार यांनी ११ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे करून प्रतिष्ठा पणाला लावली. नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक असल्याने विकासाची संधी मिळावी म्हणून अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने निवडणुकीत सहभाग घेतला. वजनदार नेत्यांनी सभा घेवून प्रत्येक प्रभाग पिंजून काढला. मात्र नगरविकास आघाडीच्या उमेदवारांनी विकास कामांचा घोषणापत्र काढून मतदारांना आपली बाजू मांडून प्रचाराला चांगलाच वेग घेतला. केंद्रीय माजी मंत्री व खासदार प्रफुल पटेल, खासदार नाना पटोले, राज्यमंत्री शाम बावणकुळे, आमदार बाळा काशीवार यांनी प्रत्येक प्रभागात सभा घेऊन भाजपाला निवडून देण्याचे आवाहन केले.दि. १ नोव्हेंबरला मतदार होणार असून ३० आक्टोबरला प्रचार तोफा थंडावणार आहेत. निवडणुकांमध्ये प्रत्येक पक्षांचे उमेदवार विकास कामावर भर देत असले तरी अद्याप मतदारांचा कौल गुलदस्त्यात आहे (तालुका प्रतिनिधी)