अन्नाजीच्या तपोभूमीत जन्मोत्सव सोहळा
By Admin | Updated: February 12, 2015 00:33 IST2015-02-12T00:33:59+5:302015-02-12T00:33:59+5:30
संतमंळींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कान्ळगावच्या तपोभूमीत परमपूज्य अन्नाजी महाराज यांची ११४ वी जयंती उत्सव गुरूदेव सेवा मंडळ कान्हळगाव ....

अन्नाजीच्या तपोभूमीत जन्मोत्सव सोहळा
राजू बांते मोहाडी
संतमंळींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कान्ळगावच्या तपोभूमीत परमपूज्य अन्नाजी महाराज यांची ११४ वी जयंती उत्सव गुरूदेव सेवा मंडळ कान्हळगाव व गावकऱ्यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.
दीड हजार लोकवस्ती असणाऱ्या कान्हळगावात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी सितारामदास महाराज, दामोधर महाराज, अन्नाजी महाराज, शंकर महाराज, सत्यपाल महाराज या संताचे विचार आजही कान्हळगावला चैतन्य व प्रेरणा देणारे आहेत. १९३४ साली अन्नाजी महाराजांनी गावकऱ्यांना भक्तीमार्गाकडे वळविले. अन्नाजींचे कान्हळगावात १४ वर्ष वास्तव्य होते. प्रितलाल सव्वालाखे, रामचंद्र नखाते, शामराव लिल्हारे, रामचंद्र कुकडकर, बळीराम लेदे, तुळशिराम बांते ही प्रमुखकर्ते मंडळी होती. १९४९ रोजी जातीय एकता निर्माण होण्यासाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील सर्वजाती धर्माचे लोक सहभोजनात त्या काळी सहभागी झाली होती. या स्तुत्य कार्याची दखल अधिकारी वर्गाने घेतली होती.
भंडारा आताचा गोंदिया जिल्ह्यात सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कान्हळगावात आले होते. अन्नाजी महाराज, स्वामी सितारामदास महाराज यांच्या सहयोगाने १९३६ मध्ये राष्ट्रसंताचे पाय कान्हळगावात पडले होते. यावेळी भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी राष्ट्रसंताच्या भजनाचा आस्वाद परिसरातील जनतेला घेता आला होता.
स्वच्छता, अस्पृश्यता, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर राष्ट्रसंताची भजने झाली होती. गावात पुन्हा नवचैतन्य निर्माण झाले होते. राष्ट्रसंताच्या प्रेरणेने १९३७ साली कान्हळगावात गुरूदेव सेवा मंडळाची स्थापना झाली होती. गावातील लोकांनी श्रमदानातून गुरूदेव सेवा मंडळाच्या इमारतीचे बांधकाम केले होते. या इमारतीला दरबार हे नाव देण्यात आले होते. आता दरबार उध्वस्त झाला आहे. उंबरीच्या झाडाखाली अन्नाजींची कुटी होती. ते उंबराचे ऐतिहासिक झाड अजूनही शाबूत आहे.
अन्नाजी महाराज यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन राज्यसभा खासदार व राष्ट्रवादीचे नेते प्रफूल पटेल यांनी वीस वर्षापूर्वी केले होते. तथापि, निधीअभावी स्मारकाचे बांधकाम झाले नाही. पूर्वी गावात रामधूनद्वारे लोकात चेतना निर्माण होत होती. सहकार्य, सेवाभाव कृत्तीची बीजे कान्हळगावात पेरली गेली आहेत. १९४२ च्या दरम्यान स्वातंत्र्य आंदोलनाने जोर पकडला होता. याचवेळी कान्हळगावात विश्वशांती सप्ताह पार पडला होता. अन्नाजी महाराज कान्हळगावात येथे आध्यात्मिक व सामाजिक कार्यात रममाण असताना स्वामी सितारामदास महाराज यांनी अन्नाजींना नरसिंह टेकडी माडगी येथील वैनगंगेच्या सानिध्यात योगसाधना करण्याची प्रेरणा दिली. अन्नाजी महाराज कान्हळगाव येथून १९४९ ला नरसिंह टेकडी येथे गेले. काही काळानंतर त्यांचे टेकडीवर देहावसान झाले.
दरवर्षी कान्हळगावात अन्नाजींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते. यावर्षी ११४ वी जयंती १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी रोजी जयंती महोत्सव साजरा केला जात आहे. ग्रामसफाई, सामुहिक ध्यान, कीर्तन, गोपालकाला आदी कार्यक्रम होणार आहेत.
सामुदायीक जीवनाची संस्कृती जपणाऱ्या या गावात सामुदायीक प्रार्थना व आठवड्याला प्रभातफेरी काढण्याचे काम नित्याचे गुरूदेव सेवा मंडळाने कायम ठेवले आहे. प्रार्थनेत विशेषत्वाने बालमंडळींचा सहभाग असतो.
अन्नाजींचे प्रेरणास्थळी प्रार्थना स्थळ तयार करण्यात आले आहे. संताची तपोभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावाला संत मंडळींनी आदर्श ग्रामची पावती दिली आहे.