लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सिंचनाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी समजल्या जाणाऱ्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाकडे मागील सात महिन्यांपासून महावितरणची थकबाकी आहे. हा आकडा आता ५३ लाख ५२ हजार ५७० रुपयांवर पोहोचल्याने २ फेब्रुवारीपासून या प्रकल्पाचा वीजपुरवठा कापण्यात आला आहे.
परिणामतः चार दिवसांपासून प्रकल्प अंधारात आहे. यामुळे सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १४ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी तयार करण्यात आलेला प्रकल्प चांदपूर जलाशयावर आधारित असून, सिहोरा परिसरातील शेतीसाठी महत्त्वाचा आहे. हा प्रकल्प मुख्यत्वे रब्बी हंगामात सिंचन सुविधा पुरवतो. पाणी उपलब्धतेनुसार येथील ६ पैकी चार पंप कार्यरत राहतात.
विशेष म्हणजे, जुलै २०२५ पासून पावसाळ्यात प्रकल्प स्थळात पंपगृहातून बावनथडी नदी पात्रातील पाण्याचा उपसा सुरू करण्यात आला आहे. चांदपूर जलाशयात पाण्याची साठवणूक आहे. जलाशय तुडुंब भरला असल्याने उन्हाळी धान पिकांना सिंचनासाठी पाणी सोडण्याचे नियोजनही तयार करण्यात आले आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे पाणी सोडण्यात आले आहे. आता दुसऱ्या टप्प्याचे पाणी सोडण्याची तयारी सुरू असतानाच ऐन हंगामात या प्रकल्पाची वीज कापण्यात आली आहे.
"सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पात विजेची थकबाकी असल्याने वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे. कंपनीला थकबाकीचे देयक अदा करण्यात आले आहे. दोन-तीन दिवसांत खंडित विजेचा पुरवठा सुरळीत सुरू करण्यात येणार आहे."- आशिष ढोके, उपविभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग, तुमसर
Web Summary : The Sondyatola irrigation project's electricity was cut due to ₹5.3 million unpaid dues. This impacts 14,000 hectares of Rabi crops during crucial irrigation phase. Project will resume in days.
Web Summary : 53 लाख रुपये के बकाया के कारण सोंड्याटोला सिंचाई परियोजना की बिजली काटी गई। इससे 14,000 हेक्टेयर रबी फसलों पर सिंचाई प्रभावित हुई। परियोजना कुछ दिनों में फिर से शुरू होगी।