भंडारा जागतिक आकर्षणाचे केंद्र होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 05:00 IST2022-03-04T05:00:00+5:302022-03-04T05:00:49+5:30
भंडारा सहापदरी बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे राजू अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आशिष आसती, व्यवस्थापक नरेश वड्डेटीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी भंडारा बायपासमुळे शंभर किलोमीटर प्रती तास वेगाने वाहतूक होईल.

भंडारा जागतिक आकर्षणाचे केंद्र होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : देशात महामार्गचा विस्तार केला जात आहे. सोबतच पर्यटन क्षेत्रालाही चालना देण्याचे कार्य सरकार करीत आहे. भंडारा जिल्ह्यातही विविध विकास कामे सुरू आहे. राष्ट्रीय प्रकल्प गोसेखुर्द धरणात वाटरपार्क, वाटरस्पोर्ट, बोटिंग, लॉजिस्टीक पार्क, तरंगते रेस्टारंट आदी प्रकल्प तयार करण्याची योजना आहे. लवकरच भंडारा जिल्हा जागतिक आकर्षणाचे केंद्र होईल, असे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी येथे सांगितले.
भंडारा सहापदरी बायपासच्या डिजिटल भूमिपूजन कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी भंडारा लगतच्या कारधा येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचे राजू अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आशिष आसती, व्यवस्थापक नरेश वड्डेटीवार उपस्थित होते. यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी भंडारा बायपासमुळे शंभर किलोमीटर प्रती तास वेगाने वाहतूक होईल. आपण आंभोरा पुलाची पाहणी केली. क्रेनमधून वर गेलो तेव्हा तेथील दृश्य पाहून हे स्थळ उत्तम पर्यटन स्थळ म्हणून विकास करता येईल, असे जाणवले. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी येथे विविध योजना राबविण्याची आपली तयारी आहे. भंडारा शहरापासून आंभोरापर्यंत बोटींगची सुविधा करण्याचा मानस असून यामुळे पर्यटनाला चालना मिळेल. या भागातील बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळेल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खासदार सुनील मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, परिणय फुके यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महामार्ग प्राधीकरणाचे आशिष असाटी यांनी तर संचालन रेणुका देशकर यांनी केले. आभार एन. एल. येवतकर यांनी मानले.
कार्यक्रमाला माजी खासदार शिशुपाल पटले, माजी आमदार बाळा काशिवार, चरण वाघमारे, रामकृष्ण अवसरे, हेमकृष्ण कापगते, भाजप अध्यक्ष शिवराम गिरीपुंजे, जिल्हा परिषद सदस्य विनोद बांते, पंचायत समिती सदस्य राजेश वंजारी, भगवान हरडे, गिरोलाचे सरपंच भजन भोंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
काळे झेंडे दाखवा पण योग्य ठिकाणी
- पवनी रस्त्याचे काम वनविभागामुळे तीन वर्षांपासून रखडले आहे. काँग्रेसने आज मला काळे झेंडे दाखिवले. याचे दु:ख नाही. परंतु योग्य ठिकाणी दाखवा, असा सल्ला ना. गडकरी यांनी दिला. वनविभाग राज्य शासनाच्या अखत्यारीत आहे. मुख्यमंत्र्याकडे वनविभाग आहे. त्यांना काळे झेंडे दाखिवले तर काम होईल, असे सांगत त्यांनी वनविभागावर आपला रोष व्यक्त केला. दरम्यान भंडारा-निलज राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडल्याने काँग्रेसच्यावतीने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. पोलिसांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांना पवनी येथे स्थानबद्ध केले होते.