भंडारा : काम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून वेल्डरचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2023 19:24 IST2023-04-28T19:23:44+5:302023-04-28T19:24:05+5:30
ही घटना शुक्रवारी साकोली येथे घडली.

भंडारा : काम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून वेल्डरचा मृत्यू
देवानंद नंदेश्वर
भंडारा : साकोली येथील मोदी पेट्रोलपंपानजीक काम सुरू असलेल्या इमारतीवरून पडून वेल्डरचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी साकोली येथे घडली. शैलेश रामकृष्ण कटकवार (३०, सौंदड) असे मृत वेल्डरचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवार, २८ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता मोदी कॉम्प्लेक्स या इमारतीच्या चौथ्या माळ्यावर वेल्डिंगचे काम सुरू होते. ही इमारत दिनेश रामनिवास मोदी यांची आहे. या इमारतीमध्ये मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या वेल्डिंगच्या कामावर कार्यरत असलेला मजूर शैलेश कटकवार हा इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
इमारतीच्या बांधकामामध्ये सुरक्षा व्यवस्थेची उपाययोजना करण्यात आली नव्हती. नेहमीप्रमाणे वेल्डिंगचे काम सुरू असताना अचानक तोल सुटला आणि चौथ्या मजल्यावरून शैलेश सरळ खाली पडला. कामावर असलेले कामगार धावत येऊन शैलेशला साकोली उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलविले. मात्र डोक्याला गंभीर इजा झाल्याने शैलेशला डॉक्टरांनी मृत घोषित केले. दिनेश बन्सपाल याच्या तक्रारीवरून साकोली पोलिसांनी दिनेश रामनिवास मोदी यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे.