लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा कागदावर टँकरमुक्त असला तरी उन्हाळ्यात प्रत्यक्षात ग्रामीण भागातील अनेक गावांसह भंडारा शहरालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कृती आराखडा तयार केला. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही. परिणामी उन्हाळ्यात पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत टंचाईग्रस्त गावांसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. त्यात नवीन नळ योजना, नळ दुरुस्ती, नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, विहिरींचे खोलीकरण आणि खासगी विहिरींचे अधिग्रहण यांसारख्या उपाययोजना प्रस्तावित आहेत. मात्र, प्रत्यक्षात कोणतेही काम सुरू झालेले नाही. यामुळे पाणीटंचाइची समस्या वाढणार आहे.
२५ गावांना बसते पाणीटंचाईची झळभंडारा जिल्ह्यातील २५ गावांमध्ये दरवर्षी जलसंकट निर्माण होते. जिल्ह्याला टँकरमुक्त घोषित करण्यात आले असले तरी भंडारा शहरातील काही वसाहतींमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. एप्रिल-मे महिन्यात टंचाईची झळ जाणवू लागते, त्यामुळे उपाययोजना सुरू होणे गरजेचे आहे.
आता पुढाकाराची गरजदरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांची यादी प्रशासनाकडे आहे. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी आराखडा नव्याने सादर केला जातो. दरवर्षी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रस्ताव सादर होतो, पण तात्पुरत्या योजना राबवल्यानंतर परिस्थिती पुन्हा 'जैसे थे' होते. प्रशासनाकडे यासंदर्भात पुरेशी माहिती असूनही केवळ तात्पुरत्या उपाययोजनांवर भर दिला जात आहे. कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज आहे.