आता नियम मोडाल तर खबरदार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:34 IST2021-04-06T04:34:19+5:302021-04-06T04:34:19+5:30
करडी (पालोरा) : मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोरोनाकाळात ...

आता नियम मोडाल तर खबरदार...
करडी (पालोरा) : मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता, त्याला एक वर्ष पूर्ण झाले आहे. कोरोनाकाळात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांना मागील वर्षी पोलिसांनी ‘दंडे का फंडा’ वापरून चांगले वठणीवर आणले होते. फटके खाणाऱ्यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओही व्हायरल झाले होते. मात्र वर्षभरानंतर आता पुन्हा पोलिसांचे फटके पडण्याची वेळ आली आहे. नागरिक मात्र अत्यंत बेफिकिरीने वागताना दिसत आहेत. त्यामुळे करडी पोलिसांनी नाइलाजास्तव विनाकारण मास्क व सोशल डिस्टन्सचा वापर न करणाऱ्यांना धडा शिकविण्याचे धोरण स्वीकारण्याची वार्निंग गावागावात माहिती देत आहेत.
जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रभाव वाढत चालला आहे. दिवसाला ८०० ते ९०० कोरोनाबाधित निघत असताना नागरिकांना अद्याप परिस्थितीचे गांभीर्य कळलेले नाही. करडी परिसरातही स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे. गावागावात कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. आरोग्य विभागाच्या तपासण्या सुरू आहेत. त्यामुळे लपलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात उघड होण्याचे संकेत आहेत. गावागावात कोरोना लसीकरण सुरू असले तरी ४५ वयोगटातील नागरिकांचे लस टोचून घेण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आता जिल्हा प्रशासन व करडी पोलीस प्रशासनाला सक्तीने वागण्याची वेळ आली आहे.
आजपासून जे नागरिक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणार नाही किंवा मास्कचा वापर करणार नाही तसेच विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतील त्यांच्यावर बळाचा वापर करून कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशी ‘वार्निंग’ करडी पोलीस स्टेशनचे ठाणेदार नीलेश वाजे यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे.
करडी सरपंचाचा पुढाकार
करडी गावात सतत कोरोनाचे संक्रमण वाढत चालले आहे. करडी व ढिवरवाडा गावात अधिक प्रभाव जाणवत आहे. परंतु नागरिकांत याविषयी कोणतीही काळजी दिसत नसल्याने अखेर करडी ग्रामपंचायतीचे वतीने सरपंच महेंद्र शेंडे व उपसरपंच गौरीशंकर सिंदपुरे यांनी पुढाकार घेत गावात जनजागृती मोहीम राबविली. कोराेनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले. स्वतः गावातील चौकाचौकात माहिती दिली. अन्यथा शासन प्रशासन कठोर पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची समज दिली.