बोगस लाभार्थ्यांना लाभ
By Admin | Updated: July 23, 2015 00:32 IST2015-07-23T00:32:33+5:302015-07-23T00:32:33+5:30
शासनाने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन वाढविण्यासाठी अनेक विशेष योजना अंमलात आणल्या आहेत.

बोगस लाभार्थ्यांना लाभ
बेरोजगारांवर कुऱ्हाड : शासनाने योग्य अंमलबजावणी करण्याची गरज
कोंढा (कोसरा) : शासनाने शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुधन वाढविण्यासाठी अनेक विशेष योजना अंमलात आणल्या आहेत. परंतु त्याचा लाभ बोगस लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. यामुळे पवनी तालुक्यातील शेकडो गरजू लाभार्थी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेपासून वंचित आहेत.
कोंढा येथे दर बुधवारला भरणाऱ्या आठवडी बाजारात पशुधनाच्या खरेदी विक्रीतून लाखोंची उलाढाल होते. शेतकऱ्यांचा पशुपालन हा जोडधंदा आर्थिक प्रगतीकडे नेणारा आहे. अनेकांनी शेतीसोबतच दुग्ध व्यवसायाची कास धरली आहे. यासोबतच शासनाने बेरोजगारी कमी करण्यासाठी या जोडधंद्याची तरुणांना मदत करणे गरजेचे आहे. मात्र, शासकीय अधिकाऱ्यांकडून याचा लाभ गरजूंना देण्याऐवजी बोगस लाभार्थ्यांना देण्यात धन्यता मानतात.
शासनाने पशुधन विकासासाठी एकात्मिक शेळी मेंढी व रस्ते विकास योजना, वराह पालन विकास, पोल्ट्री फार्मची स्थापना अशा योजना अस्तित्वात आणल्या आहेत. या योजनांमध्ये २५ ते ३३ टक्क्यांपर्यंत अनुदान, प्रकल्प उभे करताना ५० टक्के बिनव्याजी कर्ज पुरवठा अशा सवलती आहेत. या योजनांना नाबार्डकडून कर्जपुरवठा होत असतो. या सर्व योजनांची माहिती पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांकडे आहे. ही माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यास हा विभाग अपयशी ठरला आहे. या विभागाचे पशु चिकित्सालयावर देखरेख असते.
परंतु अनेक ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी पशुचिकित्सालयात उपचार कमी खासगी सेवा जास्त करीत असल्याचे निदर्शनात येत आहे. बोगस पशुचिकित्सक देखील कोंढा परिसरात खासगी व्यवसाय करून सामान्य जनतेची लुबाडणूक करीत आहे.
सुशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगारासाठी पशुधन विकास योजना फायदेशीर ठरू शकतात. पण अशा योजनांची माहितीच मिळत नाही. त्यामुळे कोंढा परिसरात बेरोजगारीत वाढ होत आहे. यापूर्वी काही अधिकाऱ्यांनी स्वार्थी हेतूने बनावट लाभार्थी दाखवून विशेष घटक योजनेचे अनुदान लाटल्याचा प्रकार देखील समोर आले आहे.
पशुधन विकासासाठी असलेल्या योजनांचा फायदा योग्स लाभार्थी व सुशिक्षित बेरोजगारांना मिळाल्यास अनेकांची बेरोजगारी दूर होवू शकते. याची योग्य अंमलबजावणी होण्याची गरज आहे. यासंबंधी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. वैद्य यांच्याशी यासंबंधी संपर्क साधला असता त्यांनी रजेवर असल्याचे सांगून बोलण्याचे टाळले. (वार्ताहर)