सिंचित क्षेत्रातील रोवणीला खते देण्यास सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:11+5:302021-07-20T04:24:11+5:30
पालांदूर : चुलबंद खोऱ्यात गत पंधरा दिवसांपासून रोवणीचा हंगाम सुरू झाला आहे. पावसाने दडी मारल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. ...

सिंचित क्षेत्रातील रोवणीला खते देण्यास सुरुवात
पालांदूर : चुलबंद खोऱ्यात गत पंधरा दिवसांपासून रोवणीचा हंगाम सुरू झाला आहे. पावसाने दडी मारल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. पहिल्या रोवणीला बळीराजा खताची मात्रा देत आहे.
पावसाळा सुरू होऊन महिनाभराचा कालावधी झाला असूनही अपेक्षित मोठा पाऊस न झाल्याने वातावरणात उष्णता आहे. पावसाची हजेरी राहील अशी आशा बळीराजाला होती. मात्र, हवामान खात्याचा अंदाज चुकल्याने मान्सूनने बळीराजाही निराश झाला आहे. पावसाने दडी मारल्याने रोवणी प्रभावित झाली आहे.
कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने शेतकरी खताची मात्रा देत आहेत. गरजेपेक्षा अधिक खताची मात्रा न देता शिफारसीनुसार खत दिल्यास जमिनीचे आरोग्य सुदृढ राहून भरीव उत्पन्नाची अपेक्षा पूर्ण होते. असे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. सेंद्रिय, जैविक, हिरवळीचे खताचे योग्य व्यवस्थापन करून जमिनीचे आरोग्य सुदृढ करण्याकरिता प्रत्येक शेतकऱ्याने प्रयत्न करण्याचे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनीही हिरवळीच्या खतांचे नियोजन केले आहे.
पावसाची अनियमितता धान पिकाला नुकसानदायक ठरत आहे. पेरण्यांना महिनाभराचा कालावधी लोटला आहे. अधिक काळ गेल्यावर उत्पन्न कमी येते. त्यामुळे वेळेवर रोवणी होणे अत्यंत आवश्यक आहे; परंतु वरुणराजा रुसल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. गत पाच-सहा दिवसांपासून वातावरण उष्ण असून, पाऊस बेपत्ता झाला आहे. त्यामुळे तण वाढण्याची शक्यता अधिक आहे. काही ठिकाणी जमिनीला भेगा पडल्या आहेत. अशावेळी पावसाची नितांत गरज आहे.
उष्णतेमुळे खोडकिडीचा त्रास वाढण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे वेळीच नियंत्रणाकरिता बळीराजा काळजी घेत आहे. नैसर्गिक पोषक वातावरण मिळाल्यास धान पीक कमी खर्चात उत्तम राहू शकते; परंतु निसर्ग बदलल्याने शेती खर्चिक झाली आहे. भर पावसाळ्यातही उन्हाळ्याची आठवण होत आहे.
कोट
तालुक्यात रोवणी अद्यापही शिल्लक आहे. रोवणी झालेल्या शेतकऱ्यांनी पाणी असल्याशिवाय खताची मात्रा देऊ नये. गरजेपेक्षा अधिक खत देऊ नये. पावसाचा अंदाज घेत जमीन सुपीकता निर्देशांकानुसार खत द्यावे.
पद्माकर गिदमारे, तालुका कृषी अधिकारी लाखनी
कोट
पाऊस थांबल्याने शेतकरी घाबरला आहे. रोवणीला पंधरा दिवस झाल्याने खत देणे आवश्यक आहे. मात्र, पावसाची नितांत गरज आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात धानाची लागवड करीत आहे.
सुखराम मेश्राम, शेतकरी, वाकल