‘निष्ठी’ रेशीम गाव म्हणून नावलौकिक व्हावा
By Admin | Updated: March 4, 2016 00:38 IST2016-03-04T00:38:28+5:302016-03-04T00:38:28+5:30
टसर रेशीम उत्पादनात जिल्ह्याला १५० वषार्पासून पारंपारिक वैभवशाली परांपरा लाभलेली आहे.

‘निष्ठी’ रेशीम गाव म्हणून नावलौकिक व्हावा
भंडारा : टसर रेशीम उत्पादनात जिल्ह्याला १५० वषार्पासून पारंपारिक वैभवशाली परांपरा लाभलेली आहे. तसेच जिल्ह्यातील निष्ठी, सितेपार, जमनी, किटाळी असे रेशीम केंद्र आहेत. त्यातील रेशीम महाराष्ट्रात विक्रीसाठी आघाडीवर आहे. ही बाब प्रशंसनीय आहे. निष्ठीस रेशीम गाव म्हणून लौकिक मिळावा. यासाठी येथील लाभार्थ्यांनी रेशिम उत्पादनात वाढ करावी. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होवून त्यांचे जीवनस्तर उंचावण्यास मदत होईल, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी येथे केले.
संयुक्त वन व्यवस्थापन समिती, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व रेशीम कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पवनी तालुक्यातील टसर रेशीम धागा निर्मिती केंद्र निष्ठी येथे टसर रेशीम धागा निर्मिती प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी टसर रेशीम लाभार्थ्यांशी संवाद साधतांना बोलत होते. त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्यकार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पवनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पवनीत कौर, उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीन, उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिलारी, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, माविमच्या ज्योती निंभोरकर, रेशीम विकास अधिकारी एस. के. शर्मा उपस्थित होते.
अनुपकुमार म्हणाले, वन विभागातर्फे लाभार्थ्यांसाठी ५० टक्के वन लागवडीसाठी उपलब्ध आहे. त्याचा लाभार्थ्यांनी फायदा घेवून गावात कोष उत्पादन करावे. तसेच उत्पादनाची टक्केवारी वाढवावी. कोष निर्मिती, रिलींग व कापड निर्मिती गावातच झाली तर निश्चितच त्याचा फायदा लाभार्थ्यांना होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल. यासाठी लागणारे सर्व सोयी उपलब्ध करण्यात येतील, असेही आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले. केंद्रास रेशिम धागा निर्मितीसाठी लाभार्थ्यांच्या मागणीप्रमाणे ४० रिलींग मशिन उपलब्ध करुन देण्यात येतील, असेही ते म्हणाले. गावातच कोषापासून सर्व प्रक्रिया करुन साडी निर्मिती केल्यास निश्चितच उत्पादनात वाढ होऊन उत्पन्न वाढीस मदत होईल असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी अनुपकुमार म्हणाले, जिल्ह्यात ५० लाख कोष उत्पादन व्हायला पाहिजे, त्यासाठी लाभार्थ्यांनी प्रयत्नशिल रहायला पाहिजे. दिवसेंदिवस वन नष्ट होत आहेत. त्यांची संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्ह्यातील रेशीम लागवडीत वाढ झाली पाहिजे व जिल्ह्याचे नाव लौकिक रेशिम जिल्हा म्हणून कसे होईल, यावर भर दिला पाहिजे. लाभार्थ्यांनी रेशिम विक्रीसाठी सक्षम बनले पाहिजे तसेच योग्य भाव कसे मिळेल याविषयी प्रयत्नशिल राहिले पाहिजे. यावेळी अनुपकुमार यांनी टसर निर्मिती केंद्रास भेट देवून तेथील रेशीम धागा निर्मिती प्रक्रियेविषयी महिला कामगारांकडून माहिती घेतली. रेशिम उत्पादन वाढीसाठी प्रत्येक गावात रेशीमदूतांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
या वर्षात १५ लाख अंडीपूंजाची निमीर्ती करण्यात आली. परंतु त्या बाजारपेठसाठी सुविधा नसल्याने अत्यल्प भाव मिळत असल्याचे लाभार्थ्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)