हिरव्या कडुनिंबावर बहरले सौंदर्य
By Admin | Updated: May 9, 2015 00:42 IST2015-05-09T00:42:51+5:302015-05-09T00:42:51+5:30
साधारणत: मार्च-एप्रिल महिन्यात कडूनिंबाच्या झाडाला फुलोरा येतो. पांढरा, पिवळसर फुलोरा हिरव्या शालूवर अधिकच....

हिरव्या कडुनिंबावर बहरले सौंदर्य
पर्यावरण रक्षक कडूनिंब : फुलोरा करतोय मोहीत
लाखांदूर : साधारणत: मार्च-एप्रिल महिन्यात कडूनिंबाच्या झाडाला फुलोरा येतो. पांढरा, पिवळसर फुलोरा हिरव्या शालूवर अधिकच खुलून दिसतो. येणाऱ्या-जाणाऱ्याला मोहिनी घालतो. कडूनिंबाचे वैशिष्ट्य म्हणजे तो ग्रीष्म ऋतूत अर्थात भर उन्हाळ्यात हिरवाकंच असतो.
‘हिरव्या कडूनिंबाच्या डोई, कुणी खोविला गजरा, पिवळसर, पांढऱ्या फुलांनी, दिसे खुलुनी साजरा, एक अनोखे लावण्य, चित्त घेतले वेधून’. या ओवी प्रतिभावंत कवी प्रल्हाद बोरकर यांच्या काव्यपंक्तीची आहेत. अशी अनुभूती सध्या आपल्या अवती-भवती फुललेले कडूनिंबाचे झाड देत आहे.
वसंत ऋतूत हिरवागार शालू परिधान केलेला, सर्वत्र फुललेला व सर्वांना आकर्षित करुन संपूर्ण परिसर प्रदूषणविरहित करणारा वृक्ष म्हणजे ‘कडूनिंब’ होय.
त्याचे वास्तव्य खेड्यापाड्यात रानावनात सर्वत्र आढळते. खेड्यांमध्ये तर उन्हाळ्यात कडूनिंब हा ग्रामस्थांचे खास विश्रांतीचे ठिकाण असतो. या झाडाची साल गर्द रंगाची, चिरा पडलेली असून पाने लांब, हिरवी, कोवळी व चवदार असतात. याची फुले पिवळसर रंगाची व लहान परंतु दाट झुबक्यांनी ओथंबलेली फांद्यांच्या अगदी टोकाला येतात.
कडूनिंब हा वातावरण शुद्ध ठेवतो, प्रदूषणाशी लढा देतो. आपल्या दातांचे रक्षण करतो, चेहऱ्यावरील मुरुमावर इलाज करतो. कडूनिंबाचा काढा पिल्याने हाडातील ताप दूर होतो. कडूनिंबाच्या निंबोळीपासून तेल काढण्यात येते.
त्यापासून साबण तयार केली जाते.
मुखशुद्धीसाठी कडूनिंबाची काडी वापरली जाते. खरुज, गजकर्ण, पित्ता कावीळ, दात दुखणे, मधुमेह आदी आजारांच्या उपचारासाठी कडूनिंब लाभदायक ठरणारा आहे. (तालुका प्रतिनिधी)
आयुर्वेदात महत्त्व
कडूनिंबाच्या वृक्षाला आयुर्वेदात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या झाडाची पाने, बिया, साल, काड्या, निंबोळ्या आदी औषधी रूपाने मानवाच्या बहुपयोगी आहेत. कडूनिंब डोक्यातील कोंडा आणि उवांपासूनही मुक्ती देतो. त्वचेला आराम देतो. त्वचेचे रक्षण करतो. रक्ताचे शुद्धीकरण करतो. कडूनिंबाची साल रसयुक्त करुन प्राशन केल्यास पोटाचे विकार, अंगातील ताप, उलटी होणे आदींपासून संरक्षण मिळते. काविळ आजारावरही कडूनिंब गुणकारी आहे.