ठाणेदारांच्या सतर्कतेमुळे बचावला बापलेकाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 22:53 IST2018-07-04T22:53:24+5:302018-07-04T22:53:57+5:30
मागील काही दिवसांपासून मुलांना चोरणारी टोळी आणि किडनी चोर गावात फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. त्यामुळे गावागावात दहशत पसरली आहे. परिणामी धुळे जिल्ह्यात पाच जणांना जीव गमवावा लागला. असाच प्रकार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे घडता घडता टळला.

ठाणेदारांच्या सतर्कतेमुळे बचावला बापलेकाचा जीव
नंदू परसावार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : मागील काही दिवसांपासून मुलांना चोरणारी टोळी आणि किडनी चोर गावात फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. त्यामुळे गावागावात दहशत पसरली आहे. परिणामी धुळे जिल्ह्यात पाच जणांना जीव गमवावा लागला. असाच प्रकार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे घडता घडता टळला.
बुधवारला दुपारी दोन वाजता सिहोराचे ठाणेदार मनोहर कोरेटी हे सिंदपुरी येथे एका ढाब्यावर चहा घेत होते. त्यावेळी एका दुचाकीवर तिघे जण व मध्ये एक मुलगी बसून जात होते. ही मुलगी वाचवा-वाचवा असे म्हणत ओरडत होती. त्यामुळे हा आवाज ऐकून पोलिसांनी त्या वाहनाचा पाठलाग केला. त्यानंतर सिहोरा बसस्थानकावर त्यांना थांबविण्यात आले. वाहन चालक हा पोलिसांना आणि लोकांना बघून खूप घाबरला. त्यानंतर कोरेटी यांनी त्या तिघांना एका ठिकाणी बसविले. आणि विचारपूस करीत ओळखपत्र मागितले. तितक्यात लोकांची गर्दी होऊ लागली. काहींनी हे किडनी चोर आहेत, त्यांना सोडू नका, असे म्हणत वातावरण तापविले. त्यानंतर ठाणेदार कोरेटी यांनी जमावाला संयमाने शांत केले. त्यानंतर त्यांनी आम्ही मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यातील रेंगाझरी येथील असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही किडनी चोर नाही. ही माझी मुलगी असून ती काही दिवसांपासून मानसिक आजाराने ग्रस्त आहे. मागे बसलेला तरूण माझा मुलगा आहे. आम्ही तिला भंडारा येथे मनोविकार तज्ज्ञ डॉ.रत्नाकर बांडेबुचे यांच्याकडे नेत असल्याचे सांगितले. परंतु ही मुलगी हे माझे वडील व भाऊ नाही, असे सांगत हे किडनी चोर असल्याचे सांगत राहिली. परंतु वडिलाने डॉ. बांडेबुचे यांच्याकडील फाईल, ओळखपत्र दाखविल्यानंतर पोलिसांना विश्वास त्यांच्यावर झाला.
त्यानंतर सिहोरा ते भंडारा रस्त्याने येताना ही मुलगी पुन्हा ओरडली तर चोर समजून लोक त्यांची पिटाई करतील, त्यामुळे कोरेटी यांनी त्यांना भंडारा येथे दुचाकीने जाऊ न देता चारचाकी वाहन उपलब्ध करून दिले. रामदयाल पटले (५५), त्याचा मुलगा पवन पटले (१८) आणि त्यांची आजारी मुलगी प्रीती पटले (२१) यांना डॉ.बांडेबुचे यांच्या रूग्णालयात आणण्यात आले. अन्यथा त्यांचा जीव गेला असता. यावेळी ठाणेदार मनोहर कोरेटी यांनी दाखविलेल्या तत्परतेचे लोकांनी भरभरून कौतुक केले.
ती मुलगी स्क्रिझोफेनियाची रूग्ण
प्रीती पटले ही तरूणी स्क्रिझोफेनिया या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णाच्या मनात संशय आणि भास असतो. ते त्याच शंकेच्या वातावरणात जगत असतात. ते कुणावरही आरोप करतात. त्यांना कुटुंबीयही जवळचे वाटत नाही. त्यांनाही काहीही बोलतात. त्यामुळे त्यांचा वास्तवाशी कोणताही संबंध नसतो. संशयच त्यांना खरा वाटत असतो. त्यामुळे असे रूग्ण कल्पनेच्या दुनियेत राहतात.
प्रीती पटले ही मानसिक रूग्ण आहे. तिच्या कुटुंबीयांनी डिसेंबर २०१७ मध्ये माझ्या रूग्णालयात आणले. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. फेब्रुवारी महिन्यात ती औषध घेणे बंद केल्यामुळे तिला पुन्हा त्रास सुरू झाला आहे. आज तिला आणले आहे. तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
-डॉ.रत्नाकर बांडेबुचे, मनोविकार तज्ज्ञ भंडारा.