नव्या कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्षांनी साधले संतुलन
By Admin | Updated: April 15, 2016 01:20 IST2016-04-15T01:20:34+5:302016-04-15T01:20:34+5:30
दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय संतुलन

नव्या कार्यकारिणीत प्रदेशाध्यक्षांनी साधले संतुलन
काँग्रेसच्या सर्व गटांना स्थान : गडचिरोलीतून मात्र एकमेव दरेकर
चंद्रपूर : दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्यकारिणीमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात राजकीय संतुलन साधल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये उमटत आहे. जिल्ह्यातील सर्व गटांतील नेत्यांना या कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाल्याने कार्यकत्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
दोन दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्या सभेनंतर महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाली. यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार नरेश पुगलिया यांना कार्यकारी सदस्य म्हणून स्थान मिळाले आहे. काँग्रेसच्या स्थानिक राजकारणात दिसणारे अंतर्गत गट स्पष्ट आहेत. या गटातील नेत्यांना प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्थान दिल्याचे दिसत आहे. विधानसभेतील काँग्रेसचे उपगटनेते आमदार विजय वडेट्टीवार यांना उपाध्यक्ष करण्यात आले आहे. तर माजी आमदार सुभाष धोटे यांना महासचिव करण्यात आले आहे. महिला काँंग्रेसच्या नेत्या डॉ. आसावरी देवतळे यांनाही या कार्यकारिणीमध्ये स्थान मिळाले असून त्यांच्याकडे सचिवपद देण्यात आले आहे.
गडचिरील जिल्ह्यातून एकमेव रविंद्र दरेकर यांचीच वर्णी या कार्यकारिणीमध्ये लागली आहे. त्यांना सचिवपद देण्यात आले आहे. तिथे केवळ एकच पद मिळाल्याने आणि अन्य दिग्गजांची वर्णी न लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातून अनेक मंडळी या कार्यकारिणीतील समावेशाची आस लावून बसली होती. मात्र अनेकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले गेले आहे. सुभाष धोटे यांच्या समावेशाचा संबंध आमागी निवडणुकांच्या दृष्टीने लावला जात आहे. पोटदुखे समर्थक मात्र कार्यकारिणीबाहेर दिसत आहे.
दोन दिवसांपूर्वी नागपुरात झालेल्या सभेच्या आयोजनाचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्वत:कडे घेत अन्य नेत्यांवर वेगवेगळ्या जिल्ह्यातील जबाबदाऱ्या सोपविल्या होत्या. या जबाबदाऱ्यांवरूनच प्रदेश कार्यकारिणीमध्ये कोणाला स्थान मिळणार याची पुसटशी कल्पना काही मंडळींना आली होती. मात्र पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा नागपूर दौरा आटोपताच महाराष्ट्राची कार्यकारिणी घोषित होईल, याचा अंदाज कुणालाही नव्हता. (जिल्हा प्रतिनिधी)