बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी आजही पवनीत सुरक्षित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 05:01 IST2020-04-14T05:00:00+5:302020-04-14T05:01:12+5:30
कुणाकडेही रेडिओ नसल्याने जुनी मंगळवारी वॉर्डात गुजरात पलन यांच्या घरापुढे रेडिओवरील बातम्या ऐकण्यासाठी मंडळी जमा झाली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी ऐकताच उपस्थित जनता भावनाविवश होवून अश्रू ढाळायला लागले. तेथेच शोकसभा घेण्यात आली.

बाबासाहेबांच्या पवित्र अस्थी आजही पवनीत सुरक्षित
लोकमत न्यूज नेटवर्क
पवनी : कोट्यवधी दिनदुबळ्या दलीत बहुजनांचे आदरस्थान असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र अस्थी आजही पवनी शहरात सुरक्षितरित्या जतन करुन ठेवल्या आहेत. या अस्थि शुक्रवारी वॉर्डातील प्राध्यापक प्रेम सूर्यवंशी यांनी जपल्या आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण ६ डिसेंबर १९५६ मध्ये झाले. आजच्या सारखी त्याकाळी प्रसार माध्यमे नव्हती. कुणाकडेही रेडिओ नसल्याने जुनी मंगळवारी वॉर्डात गुजरात पलन यांच्या घरापुढे रेडिओवरील बातम्या ऐकण्यासाठी मंडळी जमा झाली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी ऐकताच उपस्थित जनता भावनाविवश होवून अश्रू ढाळायला लागले. तेथेच शोकसभा घेण्यात आली. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी कळताच विठ्ठल राऊत यांची नरेंद्र व सुरेंद्र ही दोन मुले आणि सुखदेव मानवटकर असे तिघेजण नागपूरवरुन मुंबईला चैत्यभूमीवर पोहोचले. अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी वंदन करुन राऊत यांनी कपाळाला राख लावली. सुखदेव मानवटकर यांनी राखेत हात टाकताच एक लहानशी अस्थी मिळाली. ती गुपचूप आपल्याजवळ ठेवली.
पवनीला आल्यानंतर बाबासाहेबांची पवित्र अस्थी सूखदेव मानवटकर यांनी आपले जावई पिठूजी राऊत यांच्याकडे दिली. त्यांनी ती जपून ठेवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर पवनी येथे डॉ. बाबासाहेबांचा पुतळा १९६२ साली उभारला गेला. तेव्हा पिठूजी राऊत यांनी त्यांच्याकडे असलेल्या अस्थीचा काही भाग पुतळ्याखाली ठेवायला दिला. आणि अर्धा भाग स्वत:कडे राखून ठेवला. ही पवित्र अस्थी प्रा. प्रेमचंद व उषाकिरण सूर्यवंशी यांच्याकडे सुरक्षितरित्या जतन करुन ठेवली आहे. ऐतिहासीक महत्व असलेल्या पवनी शहरात आजही बाबासाहेबांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेण्यासाठी हजारो नागरिक पवनी येथे जातात आणि अस्थिकलशापुढे नतमस्तक होतात.