Autonomous stewardship at Aadhaar Paddy Shopping Center | आधारभूत धान खरेदी केंद्रावर मनमानी कारभार
आधारभूत धान खरेदी केंद्रावर मनमानी कारभार

ठळक मुद्देलाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांची लूट : ग्रेडर मालामाल, शासनाच्या नियमांचे होत आहे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : तालुक्यात सुरू असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रांमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे. संबंधित कर्मचारी, तसेच संचालक मंडळ व काही लोकप्रतिनीधी मनमानी करीत आहेत. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी किंमतीने धान्य विकावे लागू नये, यासाठी केंद्र शासनाकडून किमान आधारभूत धान खरेदी योजना राबविण्यात येते. यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या अभिकर्ता संस्थामार्फत राज्यात एफएक्यू दर्जाच्या धान व भरड धान्याची खरेदी करण्यात येते. त्यामुळे केंद्र शासनाने धान या धान्यासाठी राज्यात विकेंद्रीत खरेदी योजना लागू करणेबाबत केलेली शिफारस विचारात घेऊन २०१६-१७ पासून विकेंद्रीत खरेदी योजना संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय शासनाने घेऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र या धान खरेदी केंद्रामध्ये संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांकडून गलथान कारभार होत असल्याचे दिसून येत आहे.
लाखांदूर तालुक्यात सुरू असलेल्या धान खरेदी केंद्रामध्ये शेतकरी बांधवांची मोठ्या प्रमाणावर लुट होत आहे. संबंधित कर्मचारी, तसेच संचालक मंडळ व लोकप्रतिनीधी मनमानी करीत आहेत. शेतकऱ्यांनी धान खरेदी केंद्रावर धान नेल्यानंतर त्यांच्या धानाचा काटा न करता त्यांच्या मागेहून धान्य नेलेल्या शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन वजन केल्या जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना धानाच्या वजनासाठी प्रतीक्षेत राहावे लागत आहे. तालुक्यात १२ आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु आहेत. यात विजयलक्ष्मी सहकारी राईस मिल अंतर्गत लाखांदूर, पुयार, बारव्हा या तीन ठिकाणी, पंचशील राईस मिल मासळ अंतर्गत मासळ व विरली (बुज.) या दोन ठिकाणी, तर खरेदी विक्री अंतर्गत पारडी, दिघोरी, सरांडी (बुज.), हरदोली, डोकेसरांडी, करांडला, भागडी अशा सात ठिकाणी केंद्र सुरु आहेत. धान खरेदी केंद्रांवर धान नेल्यानंतर वजन करण्यासाठी टोकन दिल्या जाते. त्यानंतरच धानाचे वजन केल्या जाते. मात्र लाखांदूर तालुक्यातील धान खरेदी केंद्रामध्ये धान नेल्यानंतर त्याला टोकन दिल्या जात नाही, तर त्यांच्या मागेहुन धान नेलेल्या व्यक्तीकडून पैसे घेऊन वजन केल्या जात आहे. संचालक मंडळातील काही संचालक, बाजार समितीमधील पदाधिकारी, धान्य खरेदी केंद्रातील कर्मचारी चहापाणी व पार्ट्या घेऊन मनमानी कारभार करीत असल्याचे चित्र समोर आले आहे. तसेच हमालांकडून शेतकऱ्यांची लूट केल्या जात आहे. शासनाने हमाली नि:शुल्क केली असतांना शेतकऱ्यांची लूट केल्या जात आहे. संचालक मंडळ, आधारभूत धान खरेदी केंद्रातील कर्मचारी व पदाधिकारी, बाजार समितीतील पदाधिकारी यांच्याकडून होत असलेल्या गलथान कारभारामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

हमालांना दिली जाणारी हमाली योग्य आहे. शासनाने हमाली नि:शुल्क केली नसून, कृषी उत्पन्न बाजार समितीने चुकीची माहिती पत्रकातून पसरविली आहे.
- कुशन परसुरामकर, अध्यक्ष, राईस मिल, लाखांदूर.
शेतकऱ्यांची लूट होऊ नये, यासाठी सर्व धान खरेदी केंद्रावर इलेक्ट्रॉनिक काटे देण्यात आले असतांना कुठल्याही केंद्रावर काटे वापरले जात नाही. तसेच नि:शुल्क हमाली असल्याचे सूचना पत्रक दिले असतांना मनमानी हमाली घेतली जात आहे.
- श्रीकांत दोनाडकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, लाखांदूर.

Web Title: Autonomous stewardship at Aadhaar Paddy Shopping Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.