एसटीच्या विभागीय कार्यालयात तीस टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:37 IST2021-05-11T04:37:30+5:302021-05-11T04:37:30+5:30
भंडारा : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका हा एसटी महामंडळाला बसत आहे. गतवर्षी जवळपास सहा महिने पूर्णपणे एसटीची चाके थांबली ...

एसटीच्या विभागीय कार्यालयात तीस टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती
भंडारा : कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका हा एसटी महामंडळाला बसत आहे. गतवर्षी जवळपास सहा महिने पूर्णपणे एसटीची चाके थांबली होती. आता कुठे परिस्थिती सुधारत होती तोच आता पुन्हा एकदा संचारबंदीने एसटीची चाके पुन्हा मंदावली आहेत. सध्या राज्य शासनाने शासकीय, निमशासकीय कार्यालय तसेच एसटी विभागातही चालक, वाहक १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आदेश काढला आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची तीस टक्के उपस्थिती राहत आहे तर क्वचित प्रसंगी काही कामावेळी ५० टक्के कर्मचाऱ्यांनाही बोलवावे लागत आहे. सध्या प्रवासी वाहतूक बंद असल्याने चालक-वाहकांना ड्युटी नसली तरी एसटीची मालवाहतूक सेवा मात्र आजही सुरू असल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी डॉ. चंद्रकांत वडस्कर यांनी दिली.
सध्या संपूर्ण राज्यभर संचारबंदीने एसटीच्या प्रवासी फेऱ्या बंद आहेत. त्याचा फटका महामंडळाला दररोज बसत असून लाखोंचे उत्पन्न बुडत आहे. कोरोना आल्यापासून एसटीच्या उत्पन्नाला जणू काही ब्रेकच लागला आहे. महामंडळाचे दररोजचे कोट्यवधींचे उत्पन्न दररोज बुडत असल्याने एसटीचे चाक अधिकच खोलात चालले आहे. तांत्रिक बिघाड झाल्यास अथवा इतर काही कामे असल्यास मेकॅनिकल कामगारांना बोलवावे लागत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या यांत्रिक विभागात ३४४, प्रशासकीय विभागात २२८, अधिकारी २७, चालक ६५७, वाहक ५७९ असे एकूण १८३५ कर्मचारी एसटीच्या विभागीय नियंत्रक कार्यालय, भंडारा अंतर्गत कार्यरत आहेत. विभागीय कार्यालयात ३० ते ४० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती तर चालक-वाहकांसाठी मात्र १५ टक्के उपस्थितीचा नियम लागू असून बसेस सुरू नसल्याने काही निवडक चालकांना फक्त स्वाक्षरीसाठी बोलविले जाते. त्यातही शक्य तितके अत्यावश्यक असल्यासच बोलावले जाते.
बॉक्स
अनेक चालक-वाहक महिनाभरापासून घरीच
राज्य शासनाने संचारबंदी जाहीर करताच अत्यावश्यक सेवा म्हणून एसटी बसचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र भंडारा विभागीय नियंत्रक कार्यालयात येणारे सहा आगारात अत्यावश्यक सेवेला फारसा प्रतिसाद नसल्याने महिनाभरापासून अनेक चालक-वाहक हे घरीच राहत आहेत. मात्र असे असले तरी अनेक अधिकारी, तांत्रिक, यांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांना कर्तव्य निभावावेच लागत आहे.
कोट
सध्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत चालल्याने शासनाने सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना १५ टक्के उपस्थितीचा निर्णय घेतल्याने आम्हालाही आता कमीच वेळा बोलवले जाते. यामुळे कोरोना कमी होण्यास नक्कीच मदत मदत होणार आहे. संचारबंदीमुळे प्रवासीही बसकडे फिरकत नाहीत. ......., चालक
पंधरा टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती अनेक चालक-वाहकांना सध्या ड्युटी लागत नाहीत. मात्र बसही बंद असल्याने आम्हालाही नाईलाजास्तव घरीच थांबावे लागत आहे. आम्हाला एसटीचे आमचे वरिष्ठ अधिकारीही कोरोनात घ्यावयाची काळजी, आमचे लसीकरणही करून घेतले आहे.,....वाहक
कोट
शासनाने यांत्रिकी व प्रशासकीय विभागातील ५० कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती तर चालक-वाहकांना पंधरा टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. सध्या संचारबंदीमुळे प्रवाशांचा प्रतिसाद फारसा नसल्याने अनेक प्रवासी बसेस बंद आहेत. त्यामुळे भंडारा विभागात कामाच्या गरजेनुसारच कर्मचारी उपस्थित राहत आहेत. बसेस सुरू नसल्याने मालवाहतुकीसाठी आवश्यकच चालक-वाहकांना कर्तव्यासाठी बोलावले जाते.
डॉ. चंद्रकांत वडस्कर, विभागीय वाहतूक अधिकारी, भंडारा.