दडी मारलेल्या पावसाचे आगमन, शेतकरी सुखावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:34 IST2021-08-29T04:34:11+5:302021-08-29T04:34:11+5:30
पावसाळ्याचा सुरूवातीचा काळ वगळता पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याचे दिसून येते. गत दोन आठवड्यापासून तर पाऊस बेपत्ता झाला होता. प्रचंड ...

दडी मारलेल्या पावसाचे आगमन, शेतकरी सुखावला
पावसाळ्याचा सुरूवातीचा काळ वगळता पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याचे दिसून येते. गत दोन आठवड्यापासून तर पाऊस बेपत्ता झाला होता. प्रचंड उकाड्याने धानपीक करपण्याच्या अवस्थेत आले होते. शेतकरी पीक वाचविण्यासाठी धडपड करीत होते. तर नागरिक उकाड्याने हैराण झाल्याचे दिसून येत होते. अशा स्थितीत शनिवारी दुपारी आकाशात ढगांची गर्दी झाली. जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. श्रावण सरी बरसल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला तर धानपिकाला जीवदान मिळाले.
पवनी तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. गत काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मात्र अद्यापही जोरदार पाऊस बरसला नाही. धान पिकासाठी जोरदार पावसाची आवश्यकता आहे.
बॉक्स
प्रकल्पाची स्थिती चिंताजनक
जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस कोसळला नाही. त्यामुळे प्रकल्पातील जलसाठा निम्यापेक्षाही कमी आहे. केवळ गोसे प्रकल्पात पुरेसा जलसाठा आहे. मात्र बावनथडीसह मध्यम आणि लघू प्रकल्पात जलसाठ्याची स्थिती चिंताजनक आहे. पुरेसा पाऊस झाला नाही तर रब्बीत पाणी मिळणे कठीण होणार आहे.