गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना अटक व सुटका
By Admin | Updated: April 24, 2016 00:40 IST2016-04-24T00:40:07+5:302016-04-24T00:40:07+5:30
गोसीखुर्द धरण, वसाहत, कालवा व पुनर्वसीत गावठानासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमीनी दिल्या त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप रेंगाळलेला आहे.

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना अटक व सुटका
कब्जा आंदोलन : भूमिपूजन स्थळी पेटविल्या मेणबत्त्या
पवनी : गोसीखुर्द धरण, वसाहत, कालवा व पुनर्वसीत गावठानासाठी ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमीनी दिल्या त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्याप रेंगाळलेला आहे. त्यांच्या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी गुरूवारला कब्जा आंदोलन केले.
गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने सिव्हील कॉलनी, गोसीखुर्द वसाहतीवर ‘कब्जा आंदोलन केले’ या आंदोलनात सहभागी प्रकल्पग्रस्तांना पोलिसांनी अटक केली व नंतर सोडून दिले. दरम्यान प्रकल्पग्रस्तांनी गोसीखुर्द धरणाचे भुमिपूजन झालेल्या राजीव गांधी टेकडीवर सायंकाळी मेणबत्ती पेटवून भूमिपूजनाला २९ व्या वर्षी सुरवात झाल्याच्या स्मृतींना उजाळा दिला.
दुपारी २ वाजतेपासूनच गोसीखुर्द गावी गोसीखुर्द, गोसे बुज, मेंढा, पाथरी, जामगाव, चिचखेडा, नवेगाव, खापरी (सौंदड), खापरी (रेहपाडे), चिचाळ आदी गावातील प्रकल्पग्रस्त जमा झाले. यानंतर हे प्रकल्पग्रस्त गोसीखुर्द प्रकल्पाकडे निघाले. शेकडोंच्या संख्येतील महिला व पुरूष प्रकलग्रस्तांनी घोषणा देवून परिसर दणानून सोडला. वसाहतीच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी त्यांना अडवील्यामुळे प्रकल्पग्रस्त तिथेच रस्त्यावर धरणे अांदोलनावर बसले.
सायंकाळी या प्रकल्पग्रस्तांनी गोसीखुर्द धरणाच्या भुमिपूजन स्थळी मेणबत्या पेटवून भुमिपूजन समारंभाला उजाळा दिला. यानंतर प्रकल्पग्रस्तांनी पवनीचे नायब तहसीलदार कांबळे, धरण विभागाचे अभियंता चवरे, पोलीस निरीक्षक मधुकर गिते यांना मागण्यांचे निवेदन दिले. या आंदोलनात विलास भोंगाडे, वामन भोयर, दादा आगरे, समिक्षा गणविर, गुलाब मेश्राम, भिमराव भिमटे, रमेश भेंडारकर, राजानंद वानखेडे, राजू मेश्राम, झिबल गणवीर, कुसुम कठाणे, सुनिता मेश्राम, गंगाधर हत्तीमारे, प्यारे मेश्राम, सोमेश्वर भुरे, धर्मराज भुरे, पुरुषोत्तम मेश्राम, गुलाब उके यांच्यासह मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)