खैरी येथे पुरातत्त्व अवशेष कायम
By Admin | Updated: February 15, 2015 00:37 IST2015-02-15T00:37:49+5:302015-02-15T00:37:49+5:30
भूतकाळात होऊन गेलेल्या घटना इतिहासात जमा होतात. गतकाळात होऊन गेलेल्या घटनांची माहिती पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू आजही अस्तित्वात आहेत.

खैरी येथे पुरातत्त्व अवशेष कायम
प्रकाश हातेल चिचाळ
भूतकाळात होऊन गेलेल्या घटना इतिहासात जमा होतात. गतकाळात होऊन गेलेल्या घटनांची माहिती पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्या काळातील कोरून ठेवलेले लेख सापडलेली त्या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास गवसतो. याशिवाय चालीरिती, स्त्री परंपरा, लोककला, लोकसाहित्य समकालीन कागदपत्रे यातूनही इतिहासाची माहिती होते.
भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील रनाळा गटग्रामपंचायत अंतर्गत खैरी (तेलोता) या छोट्याशा २५६ लोकसंख्येच्या गावात पूर्वजांनी तयार केलेले अवशेष आजही अस्तित्वात आहेत. खैरी हे गाव तलावाच्या पायथ्याशी वसलेले आहे. गावाच्या उजवेकडे विशाल तलाव आहे. तलावाच्या मध्यात पूर्वजांनी स्थापन केलेली हनुमंताची पाच फुट उंच दगडाची कोरीव प्रतिमा आणि भगवान शिवशंकराचे वाहन नंदीबैल तलावातील पाच फुट मुरुमाच्या ओट्यावर आहे. अगदी त्यासमोर पाच फुट उंच मुरमी दगडाचे तीन खांब उभे करून त्याचेवर ४० फुट गोलाकार व १७ फुट आंतर लांबीचे (चौपाऱ्या) चापट आकाराचा मोठा दगड आहे. याच आकृतीला ग्रामस्थ तेलोता या नावाने संबोधतात.
तेलोत्याच्या पूर्व दिशेला २०० मिटर अंतरावर शेतात ३ मुरुमी दगडाच्या ५ फूट उंच यु आकाराची आकृती तयार आहे. त्याला येथील लोक चुल म्हणून ओळखतात. खैरी येथून पाच किलोमिटर अंतरावरील पिंपळगाव निपानी या गावाशेजारील खैरी येथील तेलोत्या सारखीच दगडाची आकृती आहे. खैरी (तेलोता) येथे तयार केलेल्या पूर्वजांच्या तेलोता या वास्तूवरूनच या गावाचे नावही खैरी (तेलोता) असे पडले अशी आख्यायिका आहे.
खैरी गावाशेजारीच ३०० लोकवस्तीचे ठाणा गाव होते. गावाला कॉलराच्या साथीने येथील लोक घरे दारे सोडून निघून गेले. ठाणा येथील पोलीस स्टेशन अड्याळला स्थानांतरण झाले. त्याचे आजही ठाणा येथूनच स्थानांतरण झाल्याची रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या परिसरात त्यांचे वास्तव्य असलेल्या जागेत उत्खनन केल्यास पूर्वजांचे मानवी साहित्य, जीवनावश्यक वस्तू आढळून येतात असे खैरी येथील वयोवृद्धांनी सांगितले. यावरून पुरातनकालीन वास्तूची निर्मिती ठाणा गावातील लोकांचे गाव सोडून पळून जाणे व तिथे पूर्वजांचे अवशेष मिळणे यावरून इतिहासाची माहिती मिळू शकते. या परिसरात पुरातत्व विभागामार्फत संशोधन करण्याची वेळ आता आली आहे.