Approval of RTPCR laboratory in stock | भंडारात आरटीपीसीआर प्रयोगशाळेला मंजूरी

भंडारात आरटीपीसीआर प्रयोगशाळेला मंजूरी

ठळक मुद्देआरोग्यमंत्र्यांचे निर्देश : लिक्वीड ऑक्सिजन टँक उभारण्याचेही आदेश, गृहमंत्रीसह प्रफुल पटेलांनी घेतला कोरोनाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता भंडारा येथे कोविड-१९ स्वॅब तपासणी प्रयोगशाळा (आरटीपीसीआर लॅब) सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. येत्या आठ दिवसात ही प्रयोगशाळा कार्यान्वीत करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गुरूवारी प्रशासनाला दिले.
जिल्हा सामान्या रूग्णालयात सुविधांची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत आरोग्यमंत्री बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार राजु कारेमोरे, जिल्हाधिकारी संदीप कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा पोलिस अधिक्षक वसंत जाधव, आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथुरकर, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री नाना पंचबुधे, धनंजय दलाल व अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग अपयशी ठरले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखून आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी खा. प्रफुल्ल पटेल यांच्या आग्रहावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी गुरूवारी जिल्हा रूग्णालयातील सुविधांची पाहणी केली. तसेच आढावा बैठकित अधिकाऱ्यांना योग्य ती सूचना केली.
कोविड-१९ चे लक्षणं असलेल्या संशयीत रूग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर तो तपासण्याची सुविधा भंडारा येथे नव्हती. स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठवावे लागत आहेत. अहवाल येण्यास दोन ते तीन दिवस उशीर होत असल्याणे उपचारासाठी वेळ लागत आहे. ही अडचण पाहता भंडारा येथे तातडीने आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा मंजूर करण्यात येत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. ही प्रयोगशाळा एका आठवडयात कार्यान्वित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासाठी लागणारे मनुष्यबळ जिल्हाधिकारी यांनी आपल्या अधिकारात तात्काळ उपलब्ध करून घ्यावे. तसेच प्रशिक्षणासाठी नागपूर येथे पाठविण्यात यावे, अशा सुचना त्यांनी दिल्यात. नागरिकांनी घराबाहेर पडतांना मास्क वापरण्याच्या सुचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या. मास्क न वापरणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी पोलिस विभागाला दिले.
जिल्हा सामान्य रूग्णालय भंडारा येथे लिक्वीड ऑक्सिजन टँक उभारण्याच्या प्रस्तावास आरोग्यमंत्र्यांनी या बैठकीत मंजूरी दिली. त्याचप्रमाणे २० ड्युरा सिलेंडरच्या प्रस्तवालाही मंजूरी देण्यात आली.
सामान्य रूग्णाला त्रास होणार नाही याची दक्षता आरोग्य प्रशासनाने घ्यावी असे सांगूण आरोग्यमंत्री म्हणाले की, जिल्हयातील ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन सपोर्ट बेड तयार करण्यात यावेत.
कोरोनाच्या उपचारासाठी आयएमएच्या सदस्यांना सहभागी करून घ्यावे. आयएमए सदस्यांना विश्वासात घेवून उपचाराचे नियोजन करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. जास्तीत जास्त चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा असे ते म्हणाले. कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम अतिशय उपयुक्त असून या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी असे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. माथूरकर यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. जिल्ह्यात गृहमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह खासदार पटेल यांच्या दौºयाने जिल्हा प्रशासन यंत्रणा जोमाने कामाला लागली होती.

कर्मचारी भरती करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्यमंत्री यांच्या हस्ते ‘टुनॅट’ प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. सदर मशिनव्दारे दिवसाला ६० चाचणी होऊ शकतात. यामुळे दोन तासांमध्ये निश्चित व अचूक निदान करणे शक्य होणार आहे. याव्दारे कोरोना रूग्ण तपासणीस वेग प्राप्त होणार आहे. कोविड-१९ उपचारासाठी मणुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे, असे जिल्हाधिकारी यांनी निदर्शनास आणून दिले. कोविड-१९ च्या उपचारासाठी लागणारे डॉक्टर, नर्स व वॉर्डबॉय यांची तात्पूरती भरती करण्याचे सर्व अधिकार आरोग्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.

Web Title: Approval of RTPCR laboratory in stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.