चिंताग्रस्त शेतकऱ्याचा हृदयाघाताने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 00:35 IST2017-12-19T00:35:18+5:302017-12-19T00:35:45+5:30
अत्यल्प पाऊस आणि निसर्गाच्या अपकृपेमुळे धानपिकाचे उत्पादन अत्यल्प झाले.

चिंताग्रस्त शेतकऱ्याचा हृदयाघाताने मृत्यू
आॅनलाईन लोकमत
मोहाडी : अत्यल्प पाऊस आणि निसर्गाच्या अपकृपेमुळे धानपिकाचे उत्पादन अत्यल्प झाले. त्यामुळे कर्ज कसे फेडायचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, या विवंचनेत असलेल्या रोहणा येथील पतिराम डोमा रेहपाडे (६२) या शेतकऱ्याचा हदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.
यावर्षी पावसामुळे रोवणी उशिरा झाली. काही शेतकऱ्यांनी रोवणी हिंमतीने करुन घेतली. पण तुडतुडा या रोगाने धान पिकावर हल्ला केला. धानाची नासाडी झाली. धान उत्पादनावर फरक पडला. धानाचे उत्पादन अर्ध्यापेक्षा हाती येत आहे. अशातच शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. रोहणा येथील पतिराम रेहपाडे यांनी धानाची मळणी केली. मळणी केल्यानंतर धानाचे उत्पन्न कमी आल्याने त्यांना चिंता सतावू लागली. मळणी केलेले धानाचे पोते शेतावरच ठेवून ते घरी आले. घरी आल्यावर कुटुंबासोबत धानाचे उत्पन्न कमी आल्याची चर्चा सुरू होती. सुनेने सासरे व पतीला जेवण करण्यास ताट वाढले. जेवताजेवता धान उत्पादन कमी आल्याचे ते सांगत होते. आता धान रोवणीची मजूरी, निंदन व कापणीही मजुरी कशी द्यायची, मळणीची रक्कम, शेती कसण्यासाठी ५० हजार रूपयाचे बँकेचे कर्ज कसे फेडायचे, यावर बोलत होते. अशातच चिंतेने भयग्रस्त झालेल्या पतीरामला छातीत दुखायला लागले. अर्धे जेवन सोडून ते बरे वाटत नसल्याचे मुलाला सांगितले. रात्रीचे ९.३० वाजले होते. नियतीच्या मनात काही औरच होते. दवाखान्यात नेतानाच पतिराम यांची प्राणज्योत मालवली. पतीरामच्या निधनाचे वृत्त रोहणा गावचे सरपंच नरेश ईश्वरकर यांना माहित झाले. त्यांनी या घटनेची माहिती तालुका प्रशासनाला दिली. आज सकाळी तलाठ्यांनी घटनेचा पंचनामा केला.
पाच एकरात झाले केवळ २० पोते धान
पाच एकर शेतीत किमान ५० पोते होणे अपेक्षित होते. परंतु २० पोते झाले. स्वत:ची तीन एकर शेती व भाड्याने २ एकर शेतीत रोवणे केले होते. रोहणा परिसरातील जमिनी १० वर्षापूर्वी बावनथडी प्रकल्पात गेल्या आहेत. त्या जमिनीचा मोबदला बºयाच शेतकºयांना मिळाला नाही. बावनथडी प्रकल्पाची कामे अपूर्ण असून बावनथडीचे पाणी रोहणा येथील शेतीला मिळत नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.