पशु दवाखाना कागदोपत्रीच
By Admin | Updated: July 23, 2015 00:33 IST2015-07-23T00:33:31+5:302015-07-23T00:33:31+5:30
बहुसंख्य शेतकरी व पशू पालकांची नोंद असणाऱ्या चुल्हाड गावातील राज्यस्तरीय पशु दवाखान्याची चर्चा न्यारीच आहे.

पशु दवाखाना कागदोपत्रीच
जनावरांचे लसीकरण अडचणीत : दवाखान्याचा फलक बेपत्ता, खासगी पशु चिकित्सकांना अच्छे दिन
रंजित चिंचखेडे चुल्हाड
बहुसंख्य शेतकरी व पशू पालकांची नोंद असणाऱ्या चुल्हाड गावातील राज्यस्तरीय पशु दवाखान्याची चर्चा न्यारीच आहे. हा दवाखाना प्रत्यक्षात शासनाच्या दस्तऐवजात असला तरी गावात मात्र दवाखानाच नसल्याचे चित्र व अनुभव गावकऱ्यांनी घेतला आहे. यामुळे खासगी पशु चिकित्सकांचा चांगलाच फायदा होत आहे.
पावसाळ्यात जनावरांना अनेक आजारांची लागण होत आहे. जनावर व दुभते जनावरे आजाराने दगावल्यास शेतकरी तथा पशु पालकांची अर्थव्यवस्था पूर्णत: ढासळत आहे. चुल्हाड गावात राज्यस्तरीय पशू दवाखाना मंजुर झाला असला तरी या दवाखान्याने वाईट अनुभव घेतला आहे. डॉ. भैसारे या दवाखान्यात नियमित सेवा देणारे ठरले आहे.
त्यांची पदोन्नती झाल्याने उच्च पदावर पोहोचले आहे. नंतर १५ वर्षापासून या दवाखान्याला नियमित पशु चिकित्सक अधिकारी प्राप्त झाले नाही. बपेरा, सिहोरा या गावातील दवाखान्यात कार्यरत डॉक्टरांना प्रभार देण्यात आला.
फक्त दोन महिने प्रभारी सेवेचा अनुभव हा दवाखाना घेत आहे. या आधी दवाखान्याचा प्रशासकीय कारभत्तर ग्रामपंचायतमधून करण्यात येत असताना संग्राम कक्ष पशु दवाखान्याच्या मानगुटीवर बसले आहे. यामुळे दवाखान्याचा प्रशासकीय कारभार व्यापारी संकुलात हलविण्यात आलेला आहे. १० बाय १० च्या खोलीत प्रत्येकी १.१ टेबल आणि खुर्ची ठेवण्यात आली आहे. दवाखाना स्थानांतरित करताना एकही पशू विभागाचे कर्मचारी व अधिकारी हजर नव्हते. ही जबाबदारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पार पाडली आहे. पशु विभागात कार्य करणाऱ्या यंत्रणेचे हे मोठे दुर्देव आहे.
जिल्हा परिषद अखत्यारित पशू दवाखान्यात कार्यरत पशु चिकित्सक अधिकारी या दवाखान्याचा प्रभार घेण्यास नाक तोंड दाबत आहेत. व्यापारी संकुलात सुविधा नाही. दुकानात साहित्य विक्री करण्याचा अनुभव प्रभारी अधिकाऱ्यांना येत असल्याने प्रभार घेण्याचे टाळण्यात येत आहे. या दवाखान्याचे चित्र बदलून शेतकरी व पशु पालकांना न्याय देण्यासाठी सरपंच रेखा सोनवाने यांनी राज्य शासनाला सातत्याने पत्रव्यवहार केला आहे. गेल्या अनेक वर्षानंतर महिना भरापासून देव्हाडीचे पशु चिकित्सक डी. पाटक यांना प्रभार देण्यात आलेला आहे. परंतु त्यांचे मुख्यालयाचे अंतर २० कि़मी. अंतर असल्याने लसीकरणाची सेवा प्रभावित होणार आहे. पावसाळ्यात होणाऱ्या जनावरांना आजारापासून संरक्षण करण्यास ही प्रभावी सेवा शक्य होणार नाही. यामुळे या दवाखान्याला नियमित सेवेची संजीवनी देण्याची गरज आहे. सेवे अभावी पशुधन अडचणीत येणार आहे.
राज्यस्तरीय पशु दवाखाना असला तरी शेतकरी व पशु पालकांच्या जनावरांना सेवा मिळाली पाहिजे. निश्चितच राज्य शासनाची उदासीनतेमुळे अखत्यारित दवाखाने कुलूप बंद होत आहे. परंतु जनावरांचा यात दोष नाही. त्यांना सेवा उपलब्ध करण्यासाठी व तोडगा काढण्याकरिता हा प्रश्न सभेत मांडणार आहे.
- प्रतीक्षा कटरे,
सदस्य जि.प. चुल्हाड.